बारामती: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार चुकीचे बोलतायेत, असे स्पष्टीकरण छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शिव – शाहू यात्रे दरम्यान संभाजी महाराजांना धर्मवीर ऐवजी स्वराज्यवीर , स्वातंत्र्यवीर म्हणा!, असे राज्यभर सांगणारे संभाजी राजे आज अचानक कसे बदलले? असा सवाल काटे यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
सध्या छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक, वरून राज्यभर वाद सुरू आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणने वावगे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच काल छत्रपती संभाजी राजे यांनी संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत असे म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेवरून त्यांचे एकेकाळचे समर्थक व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी सोशल मीडियावर याबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट सोबत काटे यांनी संभाजीराजे यांच्या सोबतचा फोटो देखील जोडला आहे.
पोस्टमध्ये काटे म्हणतात,”माफ करा राजे… आजपर्यंत आपण घेतलेल्या कोणत्याही भुमिकेला मी कधीही विरोध केला नाही, भले ती भूमिका पटो अगर ना पटो. स्वराज्यरक्षक का धर्मवीर या वादामध्ये आपण घेतलेली भूमिका आमच्यासाठी खरच धक्का देणारी आहे. दोन मिनिटं मी सुद्धा विचारात पडलो…”
हे तेच संभाजीराजे आहेत का ? जे शिव-शाहू यात्रेदरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ऐवजी स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर म्हणा म्हणुन राज्यभर सांगत फिरत होते. आज आपण अचानक भूमिका बदलली. यामागे काय कारण आहे हे मला अद्याप तरी समजलं नाही. आपले राजकीय अजेंडे काहीही असुद्यात, परंतू आपण आपल्या वैचारिक भूमिकेशी तडजोड करणे योग्य नाही.
मी शिव-शाहूंचा रक्ताचाच नाही तर विचारांचा वारसदार आहे हे आपण ज्या वेळी बोलायचा, त्यावेळी आपण एका खंबीर आणि योग्य नेतृत्वासोबत काम करतोय म्हणुन अभिमानाने आमचा उर भरुन यायचा. शिव-शाहूंनंतर आपणच असा आमचा समज झाला होता.
काही दिवसांपूर्वी आपण “स्वराज्य” संघटना स्थापन केली. त्यातून आपणास शिव-शंभु-शाहूंचे स्वराज्य अपेक्षित असावे असे आम्हाला वाटले होते. पुरोगामी विचारांच्या मंचावरून एक बोलायचं आणि राजकीय अजेंडे रेटण्यासाठी वेगळीच भूमिका घ्यायची हे आपल्याकडून अपेक्षित नाही…