चिंचवड : चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll) भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपने यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. याच शेवटच्या दिवशी ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाला अगदी शोभेल असाच प्रकार घडला. या ठिकाणी राजू काळे (Raju Kale) हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तब्बल दहा हजार रूपयांची चिल्लर घेऊन गेले. अशाप्रकारे चिल्लर आणल्याने निवडणूक अधिकारी गोंधळात पडले.
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्या, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, आता या निवडणुका बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. त्यामध्ये रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला.
राष्ट्रवादीकडून काटेंना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड येथे उमेदवार जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज काटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील उपस्थित होते.
भाजपकडून अश्विनी जगताप यांना तिकिट
चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप इच्छुक होते. पण, त्यांच्याऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले होते. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.