शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये यावं, मी त्यांना...; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून त्यांच्या नेतृत्वात देशाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. आर्थिक दृष्ट्या भारत एक सक्षम देश बनत आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत येण्यासाठी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्याबाबत आग्रह करेन, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यातील जत येथे रिपाइं आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या अभ्यासिका सभागृहाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी रामदास आठवले हे बोलत होते.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार आले असते तर कदाचित ते राष्ट्रपती सुद्धा बनू शकले असते, असं सांगून केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, कॉमन मिनिमम प्रोग्राम हाती घेऊन मोदी आणि पवार हे दोन नेते एकत्र येणे गरजेचे आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, कारण मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.
‘राज ठाकरे यांचा महायुतीला कसलाही उपयोग नाही’
लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे आमच्यासोबत आले होते, मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही. उलट विधानसभेला ते आमच्या सोबत नव्हते त्यावेळी आम्हाला जास्त प्रमाणात यश मिळालं. त्यामुळे रोज भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरे यांचा महायुतीला कसलाही प्रकारचा उपयोग नाही. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाआघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा महायुतीला होईल असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे उपस्थित होते. यावेळी अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, नाना वाघमारे, श्वेतपद्म कांबळे, भूपेंद्र कांबळे, अरविंद कांबळे, महावीर कांबळे, जतचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे, विनोद कांबळे, अविनाश वाघमारे, आनंद कांबळे, छायाताई सरवदे यांच्यासहित जत तालुका आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.