म्हसवड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले म्हसवडचे ग्रामदैवत श्री. सिध्दनाथ मंदिरात श्रीरामलल्ला च्या प्राणप्रतिष्ठपणेचा सोहळा विविध धार्मिक पध्दतीने साजरा करण्यात आला, यावेळी प्रभूरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण तसेच हनुमान व श्री भोलेनाथ शंकर यांच्या मूर्ती मोठ्या जल्लोषात व श्रीरामाच्या जयघोषात मंदिरातील सिंहासनावर विराजमान करण्यात आल्या.
दरम्यान, एक आठवडा अगोदर पासून सिद्धनाथ मंदिर गाभाऱ्यापासून प्रदक्षिणा मार्ग तसेच संपूर्ण मंदिर परिसर झाडून स्वच्छ करून धुवून घेण्यात आला होता या कामांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनीही कार्यकर्त्यांसह आपला सहभाग नोंदवला होता .त्यानंतर गाभारा, हत्ती मंडप, प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर आणि शिखर यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती आजच्या दिवशी मंदिर परिसरातील सर्व गुरव समाजाच्या घरोघरी आकर्षक रेखीव रांगोळ्या काढून उंच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या सर्व परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते, सकाळपासून मंदिरामध्ये विविध मंडळांचे भजनाचे कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या दरम्यान शहराच्या मुख्य पेठेतून श्री प्रभू राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत आणि श्री. शिवशंकर यांच्या मूर्ती ढोल ताशांच्या गजरासह जय श्रीरामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर सदर मूर्ती ठेवण्यात येऊन त्यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर हत्ती मंडपाच्या पाठीमागे सजविण्यात आलेल्या सिंहासनावर या मूर्ती विराजमान करण्यात आल्या. सदर विधी धार्मिक पद्धतीने करण्यात आला. मूर्ती विराजमान झाल्यानंतर हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र, सामूहिक रामनामाचा जप, महाआरती आणि बरोबर 12 वाजून 29 मिनिटांनी अक्षतांसह पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर जमलेल्या तमाम राम भक्तांना सिद्धनाथ देवस्थान व गुरव समाज यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दरम्यान, संध्याकाळी गुरव समाजातील प्रत्येक घरी, पाच दीप प्रज्वलित करण्यात येऊन मंदिरामध्ये हजारो दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
अशाप्रकारे आयोध्यातील प्रभू श्री. रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जशी करण्यात आली ,त्या पार्श्वभूमीवर येथील मंदिरात दिवसभर मोठ्या जल्लोषांमध्ये जय श्री रामाच्या घोषणांमध्ये भक्तिमय वातावरणात व धार्मिक उपक्रमांसह श्री राम लल्ला च्या मूर्ती विराजमान करून देशातील नव्हे तर जगातील सर्वांच्या आनंदामध्ये सहभाग घेण्यात आला. सर्व परिसर व वातावरण राममय झाले होते.