कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेच्या जवळ रस्त्याने चालताना पादचारी अनिल कृष्णा कदम (५६, रा. जानवली बौद्धवाडी) गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिल कदम यांचा मृत्यू होऊन २४ तास उलटले तरी अपघातास कारणीभूत असलेल्या वाहन चालकास अटक न केल्याने त्याचप्रमाणे महामार्ग प्राधिकरणाने दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी जाणवली येथे मुंबई – गोवा महामार्ग रोखुन धरला. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत नागरीक महामार्गावर ठाण मांडून होते. महामार्गाच्या दोन्ही बाजुला जवळपास ४ ते ५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत कार चालकाला पोलीस अटक करत नाही, तसेच महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत महामार्गावर रास्ता रोको ठेवण्याचा इशारा देत महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले होते. दरम्यान कणकवली तहसिलदार दिशांत देशपांडे यांनी घटनास्थळी जात याप्रकरणी महामार्ग प्राधिकरण अधिकारी, महामार्ग ठेकेदार कंपनी यांच्यासमवेत बैठक घेत ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत योग्य तो तोडगा काढण्यात येईल. अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाच्या माध्यमांतून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
मुंबई गोवा महामार्ग रोखला
जाणवली येथील अनिल कदम यांचा मृत्यू होऊन २४ तास उलटले तरी कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास महामार्ग रोखून धरला. महामार्ग अचानक ग्रामस्थांनी रोकल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी जाणवली आणि आसपासच्या गावातील शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सामील झाले होते. महामार्गावर लाकडी ओंढके त्याचप्रमाणे चिरे ठेवून दोन्ही बाजूंची वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे गोव्याहून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून गोव्याकडे येणारी सर्वच वाहतून कोलमडली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजुला लागल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांची चर्चा करताना ग्रामस्थांनी प्रांताधिकार्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
[read_also content=”हरकुळ बुद्रुक येथे शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे, कौलांचे वाटप https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-mp-vinayak-raut-at-harkul-budruk-sindhudrug-kankavali-534834.html”]
घटनास्थळी पोलीस दाखल
महामार्ग रोको आंदोलन माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आढाव, पोलीस निरिक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला. आंदोलन झाल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीसांनी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सावडाव मार्गे वळवले. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या ५ किलोमीटर पर्यंत रांगा जाणवली बौद्धवाडी येथे अचानक आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत अपघात केलेल्या कारचालकावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे जाणवलीच्या दोन्ही बाजूला ५ – ५ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांना या आंदोलनाचा फटका बसला आहे.
जोरदार घोषणाबाजी
मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथे याच ठिकाणी गेल्या १५ दिवसांत वाहनाने ठोकरल्याने तिघांचे बळी गेले असून महामार्ग प्राधिकरण त्याचप्रमाणे प्रशासन कोणतीही कार्यवाही करु शकलेले नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला असून अपघातास कारणीभुत वाहनधारकांवर अजुनपर्यत का करवाई झाली नाही? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे? असे सांगत अपघातास कारणीभूत वाहनधारकास अटक करा आणि महामार्ग प्राधिकरणावर दोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी करत महामार्ग प्राधिकरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
[read_also content=”नववी नापास मुलाचे कारनामे; युट्युबवर बघून छापल्या नकली नोटा https://www.navarashtra.com/crime/exploits-of-the-ninth-fail-boy-fake-notes-printed-by-watching-on-youtube-navi-mumbai-534807.html”]
प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी दाखल
महामार्ग रोखुन धरल्याचे समजल्यानंतर कणकवली प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसिलदार दिशांत देशपांडे घटनास्थळी दाखल आले. त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकुन घेत याबाबत प्रशासन आवश्यकते सहकार्य करेल. महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित केसीसी बिल्डकॉन कंपनीची अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांची ग्रामस्थांसमवित बैठक घेत येत्या दोन दिवसांत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम होते. तहसिलदारांसमोर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याठिकाणी तिघांचा बळी जाणूनही त्यांच्या नातेवाईकांना शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही अशी खंत व्यक्त केली. यावेळी तहसिलदारांनी सबंधितांच्या नातेवाईकांनी आवश्यक ते कागदपत्र सादर करावेत. आपण शासकीय पातळीवर मदत करु असे सांगितले.
कुटुंबियांची घेतली भेट
महामार्गावर ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर तहसिलदार दीशांत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आढाव, पोलीस निरिक्षक समशेर तडवी यांनी अनिल कदम यांच्या कटूंबियांची भेट घेतली. यावेळी कुटंबियांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. २४ तास उलटले तरीही आरोपी मिळत नाही मग पोलीस यंत्रणा करते काय? असा सवाल करताना तिघांचे बळी जाऊनही दखल घेतली जात नाही. आमच्या कुटुंबाने जगायचे कसे अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी तहसिलदार यांनी अनिल कदम यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतीचे आश्वसान दिले.
अखेर आंदोलन मागे
प्रभारी प्रांताधिकारी, तहसिलदार दीशांत देशपांडे यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मयतांच्या नातेवाईकांना प्रशासन मदत करेल. प्रभारी प्रांताधिकारी दीक्षांत देशपांडे जाणवली येथे झालेल्या अपघातात अनिल कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर महामार्ग रोखत ग्रामस्थांनी रस्ता रोको करून आंदोलन छेडले. यावेळी घटनास्थळी दाखल झालेले प्रभारी प्रांताधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी प्रशासनाकडून या गावातील अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सुदीप कांबळे, अनिल तांबे, जाणवली सरपंच अजित पवार, संदीप सावंत, भालचंद्र दळवी, भगवान दळवी, महेश कदम, दीपक कदम, किसन पवार, सुरेंद्र जाधव, सचिन तांबे, हेमंत कांबळे, सुप्रिया डांगमोडेकर, विलास कदम, अलका कदम, रसिका पवार, गोपीकृष्ण पवार, प्रज्ञा कदम, बाळा डांगमोडेकर, किरण कदम, विठ्ठल कदम, नयन साटम, मंगेश पवार, पोलीस पाटील मोहन सावंत, संतोष कारेकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.