चिपळूण : पावसाळा असो किंवा कोणताही ऋतू रस्त्यांबाबतची दुर्दशा ही कायमची नागरिकांच्या पाचवी पुजलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्यमहामार्ग प्रशासनाचं याकडे कायमच दुर्लक्ष होत असतं. पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे कायमच हाल असतात. हायवेने जाणं म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखं आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. वाहन चालकांची खड्डे चुकवताना दमछाक होत आहे. तसेच या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यानंतर तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.
कळंबस्ते – धामणंद मार्गावरील खांदाट पाली ते निरबाडे मार्गे काडवली तसेच पंधरागावकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. यामुळे बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा सर्रास वापर करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत पावसात तर या खड्ड्यांमधून पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्डे चुकवणे अवघड होऊन बसत आहे. विशेष म्हणजे वाहने खड्ड्यात आपटून वाहन चालकाला त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चढ अथवा उतारात देखील हीच परिस्थिती असून खडी देखील मोठ्या प्रमाणात वर आली असल्याने दुचाकी घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असून पावसाळ्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी काही खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवले आहेत. मात्र, अन्य खड्डे ‘जैसे थे’ असल्याने या पुलावरून वाहने चालवताना जीव मुठीत घ्यावा लागत आहे. तसेच हा पूल जुना असल्याने नव्याने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
याचबरोबर चारगावची ग्रामदेवता श्री रामवरदायिनी मंदिरापासून ते काडवलीकडे जाणाऱ्या पुलावर देखील तशीच परिस्थिती आहे. 21 जुलै 2021 च्या महापुरात या पुलाचे रेलिंग तुटलेले असून अजूनही या पुलाची डागडुजी करण्यात आलेली नाही. हा पूल देखील काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून नव्याने पूल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. या पुलावरील खड्डे चुकवताना रेलिंग नसल्याने वाहन नदीत कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. एकंदरीत हा मार्ग खड्डेमय तितकाच धोकादायक बनलेला असून शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.