चिपळूण : शहरातील मुख्य मध्यवर्ती बस स्थानक आणि दुसरे शिवाजीनगर येथे असणारे बसस्थानक या दोन्ही ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. मात्र शिवाजी नगर बसस्थानक हे काही महिन्यांपूर्वी समोरचा परिसर एकदम सिमेंट काँक्रेट केलेला दिसतो. मात्र या शिवाजीनगरच्या बसस्थानकाची इमारत जुनीच आहे या इमारतीमध्ये सध्या शाळेतील मुलांची दिवसाची खूप गर्दी असते आणि प्रवासी असतात मात्र तिथे अक्षरशा गोठ्यातल्या शेण मूत्राचा वास नेहमीच ते येत असतो. त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शिवाजी नगर बसस्थानकात स्वच्छतेची गरज असल्याचे बोलले जात आहे.
चिपळूण शहरातील शिवाजीनगर बसस्थानक हे गेले काही वर्ष बंद अवस्थेतच होते. या स्थानकातील इमारतीमध्ये असणारे उपारगृह सुद्धा बंद आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी बसस्थानकाच्या समोरचा परिसर सिमेंट काँक्रीट केला आहे. त्याचबरोबर लाईट बसविल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकमध्ये सर्व गाड्या येत असतात. या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सकाळी सहा वाजल्यापासून याच बसस्थानकात दिसून येतात.
मात्र बस स्थानकामध्ये सध्या रात्रीच्या वेळेस गुरांचा वावर आणि कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे तिथे गुरांचे शेण, मुत्र आणि त्यांचा वास भयंकर येत असतो. अक्षरशा आपण गोठ्यात आहोत का असा भास त्या ठिकाणी होतो.त्याच बरोबर बसण्याच्या आसनांवरती कुत्र्यांचे पाय, कुत्र्यांचे केस पडलेले असतात. म्हणजे बसण्याची व्यवस्था असून ही साफसफाई नसल्यामुळे प्रवासी बसू शकत नाही. त्याचबरोबर इमारतीला गळती लागल्यामुळे पाणी सुद्धा आत मध्ये येत असते. येथे पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत. मात्र नळाची अवस्था पाहता पाणी कोण पिते का ? हा सुद्धा प्रश्न मनात येतो. नळ असेच काही वेळा चालू असतात. त्यामुळे पाणी ही वाया जाते. मात्र, त्या ठिकाणी ड्यूटीवर असलेले कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाहीत.
बसस्थानकाची इमारत जुनीच असल्याने तिला गळती लागलेली आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूला बाटल्यांचा खच आणि झाडे झुडपे वाढलेली दिसतात. अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येते. समोरचा भाग जरी चकाचक असला तरी इमारतीच्या दोन्ही बाजूला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येते. त्याच बरोबर शौचालयाची इमारत ती सुद्धा दुरुस्तीला आली असून तिची दुरावस्था झालेली आहे. आत मध्ये सर्व लाईटची लाईन तुटलेली आहे. त्याचे बोर्ड आणि वायर लटकत आहे. आत मधी जाणाऱ्या प्रवाशांना कदाचित यामुळे धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत पाहता शिवाजीनगर बसस्थानकाचा समोरचा परिसर जरी सुंदर बनवला असला तरीही मुख्य इमारत आणि बाजूला घाणीचे साम्राज्य दिसते. बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहे. पुरुष व महिलांचे स्वच्छतागृह सुद्धा समस्येच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. चिपळूण आगार व्यवस्थापनाने प्रामुख्याने या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन इथल्या सेवा सुविधा लवकरच पूर्ण कराव्यात अशी प्रवाशांची मागणी हे. रात्रीच्या वेळी जे कर्मचारी या शिवाजीनगर मध्ये सेवा बजावतात त्यांनी खरंतर तेथील येणारी गुरे हाकली पाहिजेत. त्यामुळे शिवाजीनगर मध्ये प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी एवढीच माफक अपेक्षा आहे, असं त्रस्त असलेल्या प्रवाशांचं म्हणणं आहे.