चिपळूण : राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य महामार्ग खड्ड्यांची समस्या कायमच आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे दिवसेंदिवस प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. सध्या चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर (खंड बायपास, चिपळूण) यांनी केली आहे.
या संदर्भात मंडळाच्या वतीने चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सदर मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.”
मंडळाने यापूर्वीही उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना समस्येविषयी माहिती देऊन वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक कारणास्तव जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, “सदर परवानगी घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे.
बावशेवाडी येथे रस्त्याला दोन ठिकाणी टी-जॉइंट येतात तसेच वळण असल्याने वाहनांचा वेग वाढल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत आमदार शेखर निकम यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींना देण्यात आली आहे. सध्या लांबच्या पल्ल्या प्रवास जीवघेणा ठरत आहे, याचं कारण म्हणजे रस्त्यांवर असलेले खड्डे आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था. आतारपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे ४५०० बळी गेल्याचं अहवालामध्ये सांगितलेलं आहे. या सगळ्यावर काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी रस्त्याची पाहणी केली होती. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले.
मात्र कोकणवासीयांचा सरकारच्या आश्वासनांवर विश्वास उरलेला नाही. प्रत्येक गणेशोत्सवाच्या तोंडावर दौरे, फोटोसेशन आणि गोड बोलांची परंपरा सुरू असते, पण वर्षभर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचा धोका पत्करावा लागतो. अपूर्ण टप्पे तातडीने पूर्ण करण्याचा ठोस आराखडा कुठे आहे? कामातील विलंबाबद्दल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली का? प्रत्येक टप्प्याचे पारदर्शक वेळापत्रक कधी जाहीर होणार? मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई का दिली जात नाही?
जनतेच्या ठाम मागण्याः प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून त्याचे पालन करावे. जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा. मृत्यूग्रस्त कुटुंबांना भरपाई द्यावी. गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत. कोकणवासीयांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे आश्वासनं नकोत, आता कृती हवी. फोटो नकोत, खड्डेविरहित सुरक्षित प्रवास हवा, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे.