ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : SRA योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबाव आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील दोन झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये, अशा कडक शब्दांत सुनावले.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली उल्हासनगरहून नागरिक आले होते. यावेळी ठाण्यातील नळपाडा आणि भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली.
भांजेवाडी येथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांना एसआरए योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केली. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचे रहिवाशांनी केळकर यांना सांगितले. तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली. केळकर यांनी तत्काळ संबंधित एसआरए अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. या रहिवाशांवर अन्याय होता कामा नये. त्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू, असे केळकर यांनी खडसावले.
यावेळी नाईकवाडी येथील सीडीपीए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या. विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण आणि नोकरीही देण्याचे आश्वासन संस्थेकडून दिले जाते, पण या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर अडीच लाखांचे कर्ज झाले असून प्रशिक्षण अर्धवट तसेच नोकरीही दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली. अशा तक्रारी घेऊन आणखी ५० विद्यार्थिनी येणार असल्याचे कळते. याबाबत केळकर यांनी सोमवारी या प्रकरणाचा निकाल लावू, असे स्पष्ट केले.
या उपक्रमात उल्हासनगर महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून सफाई कामगाराने भेट घेतली असता केळकर यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सफाई कामगाराच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला.
जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आज आर्थिक फसवणूक, वारसा हक्क, घर देतो असे सांगून केलेली आर्थिक फसवणूक, नोकरी मिळणे, परिसर स्वच्छता, अशा विविध समस्या घेऊन शेकडो नागरिक उपस्थित राहिले होते. यातील अनेक समस्यांची जागीच उकल करण्यात आली. उर्वरित समस्या लवकरच मार्गी लागतील असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यावेळी अमित सरैय्या, महेश कदम, सुरज दळवी, ओमकार चव्हाण, सुरेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.