
दापोलीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ!
निसार शेख/दापोली: दापोली तालुक्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, विजेच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाचे सत्र अखंड सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर साखळोली येथे गुरुवार, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता दोन घरांवर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक रहिवासी डॉ. राजकुमार बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज पडल्याने त्यांच्या घरासह रामकृष्ण बर्वे आणि शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घरांना फटका बसला. वीज मीटरजवळ कोसळल्याने घरातील मीटर, वायरिंग, तसेच त्याखाली ठेवलेली खुर्ची आणि बेड पेट घेतले. सुदैवाने त्या वेळी घरातील सर्व सदस्य अंगणात बसलेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वीज पडताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
करमरकर यांचे घर त्या वेळी बंद असल्यामुळे ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून आग विझवली, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, त्या घरातील विद्युत उपकरणे, इन्व्हर्टर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील सुनिल सोनू गौरत, उपसरपंच दिनेश भागोजी जाधव, माजी उपसरपंच अनिल विश्राम शिंदे, तसेच संदीप आणि मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी वेळ न दवडता मदतकार्य आणि बचावकार्य सुरू केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी ! e-KYC च्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती
या घटनेपूर्वी फक्त दोन दिवसांपूर्वीच जालगाव येथे देखील वीज पडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सलग घडणाऱ्या या घटनांमुळे परतीच्या पावसाचा फटका दापोलीकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आता स्थानिक नागरिकांना वीज पडण्याच्या संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.