
निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन व्यवसायाने देखील समृद्ध आहे. अनेक पर्य़टक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. रत्निगिरी जिल्ह्यातील बहुतांश स्थानिकांचा रोजगार हा पर्यटनावर आधारित आहे. मात्र बाहेरुन येणाऱ्या या पर्यटक आता स्थानिकांची डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येत आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत . मात्र त्यातील काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे किनारा हा नैसर्गिक सौंदर्य, निळाशार समुद्र आणि मत्स्यव्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन हंगाम सुरू होताच येथे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत काही पर्यटकांकडून सुरू झालेली हुल्लडबाजी, मोठ्या आवाजात संगीत, मद्यपान आणि किनाऱ्यावर कचरा टाकणे या प्रकारांवर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हर्णै येथील समुद्रकिनाऱ्यावरआपली वाहने नेऊन हुल्लडबाजी करण्याचा प्रकार आज उघड झाला आहे. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक माहित नसल्याने समुद्रकिनारी नेलेली वाहने भरतीच्या पाण्याने किनारीच रुतून बसल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अनेक पर्यटक समुद्रकिनारी वेगाने वाहने चालवून स्टंट करताता.मनमानी करणाऱ्या हुल्लडबाजांमुळे किनाऱ्यावरील इतर पर्यटकांना त्याचा त्रास होतो व अपघाताचा धोकाही संभवतो. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने समुद्रकिनारी वाहने नेण्यास मनाई केली होती. मात्र हा नियम धाब्यावर बसवून त्याकडेही हे पर्यटक दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक पोलीस आता या अशा हुल्लडबाजांवर काय कारवाई करतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी हर्णे समुद्रकिनारा स्वच्छ आणि शांत राहावा यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असतात. पण काही बेजबाबदार पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करून किनाऱ्यावर गोंधळ घालताना दिसतात. रात्री उशिरापर्यंत गाड्यांमधून मोठ्या आवाजात गाणी, बाटल्यांचा कचरा किनाऱ्य़ाला आणि समुद्रात होत असल्याने याचा मत्सव्यवसायावर देखील परिणाम होत आहे, असं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलं आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारांबद्दल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून, पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील केली. तरीही अनेकजण या हुल्लडबाजांवर काहीही परिणाम होत नाही. याबाबत कचरा करणाऱ्यांना पर्यावरणप्रेमींनीही इशारा दिला आहे की, अशा वर्तनामुळे समुद्रकिनाऱ्याचं पर्यावरणीय संतुलन बिघडू शकतं आणि मत्स्यव्यवसायावर परिणाम होऊ शकतो. पर्यटकांसाठी हा किनारा आकर्षणाचा केंद्रबिंदू असला तरी जबाबदारीने वागण्याची गरज आहे, “हर्णेचं सौंदर्य आणि शांतता टिकवायची असेल, तर पर्यटकांनी शिस्त आणि स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे.”असं आनाहन देखील स्थानिक प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. प्रशासनाने पुढील काही दिवसांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी दाखवली असून, हर्णे किनाऱ्याचं सौंदर्य आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचं नियोजन सुरू आहे.