दापोली /समीर पिंपळकर: थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारे मिनी महाबळेश्वर म्हणजेच दापोलीत गेल्या काही दिवसांपासून येथे सतत पाऊस पडत होता. मात्र दापोलीत दोन दिवसांपासून सकाळी दापोली शहरवासीयांना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पसरलेल्या या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेता आला. दापोलीत धुके पडू लागल्याने अखेर हिवाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.
रत्नागिरीमधील दापोली शहर गेले दोन दिवस सकाळच्यावेळी दाट धुक्यांच्या दुलईत लपटल्यासारख्या दिसत आहे. त्यामुळे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेले नागरिक या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.दापोली तालुक्यात मागील काही दिवस दररोज सायंकाळच्या सुमारास पाऊस पडत होता. सकाळी व दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस अशी स्थिती होती. सतत वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे विविध साथीचे रोग पसरत असून, नागरिक त्रस्त झालेले होते. आज ना उद्या वातावरणात बदल होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती. त्यानुसार गेले दोन दिवस वातावरणात बदल झाला आहे. सकाळीच घराबाहेर पडलेल्या नागरिकांना दाट धुक्याचा आनंद घेता येत आहे. घाटपरिसरात दाट धुके असल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण जात आहे
दापोली शहरात पडलेले धुके इतके दाट होते की सकाळच्या वेळेत काही विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे दापोली शहरातून मार्गस्थ होणाऱ्या तसेच दापोलीत आलेल्या लोकांना आपल्या वाहनांचे दिवे लावूनच रस्ता पार करावा लागत होता. निसर्गातील बदलांमुळे दुपारपर्यंत कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीट जाणवत आहे. परतीच्या पावसाने कायमची रजा घेतल्यामुळे दापोलीत समाधानकारक वातावरण आहे. शेतकरीवर्गांचीही कापणीची लगबग सुरू असून शेतातील धान्य घरात नेण्याची त्यांची धांदल सुरू झाली आहे.
पर्यटनालाही मिळेल चालना
दापोली हे राज्यातील पर्यटकाचे पसंतीचे ठिकाण आहे. आता राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही दापोलीत पर्यटक येतात. सध्या शाळा महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने येथील सुदंर वातावरण अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतील.त्यामुळे या गुलाबी थंडीच्या चाहूलीमुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
दापोलीतील प्रमुख पर्यटन स्थळे
दापोलीमध्ये दाभोळ, हर्णे, आंजर्ले, मुरुड असे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. तसेच शिवरांयांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दाभोळ येथील चंडिका मंदिर, हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला, केळशीतील महालक्ष्मी मंदिर, याकुबाबा दर्गा अशी ऐतिहासिक पर्यटन स्थळेही आहेत.