
चिपळूण नगराध्यक्षपद अनारक्षित असल्याने पक्षांची चढाओढ सुरू
महायुती होईल की नाही? याबाबत साशंकता
इच्छुक उमेदवारांना मिळणार कमी कालावधी
संतोष सावर्डेकर/ चिपळूण: नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार दि. १० नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. मात्र, अजूनही राजकीय पक्षाकडून महायुती-महाविकास आघाडी संदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांचे इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहेत. तर दुसरीकडे वेगवान घडामोडी घडत असून राजकीय खलबते सुरू आहेत. यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष पद अनारक्षित असल्याने यावेळच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे आपले वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे.
इच्छुक उमेदवारांना मिळणार कमी कालावधी
गेले तीन वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेली चिपळूण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली दिनांक २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर दिनांक ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. सुमारे महिनाभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने इच्छुक उमेदवारांना अगदी थोडा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक अॅक्शन मोडवर आले आहेत.
घटक पक्षांच्या बैठका होत असल्याची चर्चा
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका होत असल्याची माहिती मिळत आहे, तर महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे बैठक अजूनही झालेली नसल्याचे समजते. यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून महाविकास आघाडी की स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून शिवसेनेचे चिपळूण शहर प्रमुख उमेश सकपाळ, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून माजी नगरसेवक विजय चितळे, मंगेश उर्फ बाबू तांबे हे इच्छुकांच्या यादीत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून मिलिंद कापडी यांचे एकमेव नाव पुढे आले आहे.
महायुती होईल की नाही? याबाबत साशंकता
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री दय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौ-यादरम्यान महायुतीतून निवडणुका लढवल्या जातील असे स्पष्ट केले आहे. मात्र, शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षाचे पदाधिकारी वगळता शिवसेना-भाजपा या दोन पक्षांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने रणनीतीचाबत चर्चा झाली. या बैठकीत महायुती म्हणून निवडणुका होतील, असे चर्चिले गेले असले तरी अजूनही महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तव झालेले नाही, यामुळे महायुती होईल की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.