
सोलापुरात सत्तेतील मित्र पक्षांनी मारली विजयाची बाजी; कुणाला किती जागा मिळाल्या?
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या तीन नगरपरिषदेच्या निवडणूकीत अकलकोट आणि मैंदर्गी नगरपरिषद मध्ये घवघवीत यश मिळाले आहे. तर मंगळवेढा पंढरपूरचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्या हातातून मंगळवेढा आणि पंढरपूर नगरपरिषद निसटल्या आहेत. आवताडे यांचे नातेवाईक सुनंदा आवताडे मंगळवेढा तर पंढरपूर स्व. आमदार भारत भालके यांच्या सुन डॉ. प्रणिता भालके या स्थानिक आघाडीतुन विजयी झाल्या आहेत. यासह भाजपाने बार्शी नगरपरिषदेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे. तर अनगर नगरपंचायत माजी आमदार राजन पाटील यांनी बिनविरोध केली आहे. राजन पाटील यांनी गेल्या महीन्यात भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात १२ पैकी भाजपाला ३ नगर परिषद आणि १ नगरपंचायात खेचण्यात यश प्राप्त झाले आहे.
शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे . माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेचे नगराध्यक्षांसह २२ उमेदवार विजयी झाले आहेत. यासह सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदेसेनेचा झेंडा नगरपरिषेदेवर फडकविला आहे. मोहोळमध्ये प्रथमचं शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. कुर्डवाडी नगरपरिषदेत शिवसेना उबाठा गटाने आपले स्थान आबाधीत ठेवले आहे.
करमाळा नगरपरिषदेवर स्थानिक आघाडीचा प्रभाव दिसून आला. सावंत गटाने वर्चस्व स्थापन केले आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून राहीलेल्या अकलूज नगरपरिषद सर्वाधीक चर्चेत राहीली. खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यात आली. या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यश संपादन केले. अजित पवार गट आणि भाजपाने उभा केलेल्या नगरध्यक्षपदाचा उमेदवार यांचा दारूण पराभव झाला आहे.
सोलापूर नगरपरिषद निवडणूक निकाल नगराध्यक्ष
भाजपा – ०४
शिवसेना एकनाथ शिंदे गट – ०३
तीर्थक्षेत्र विकास आघाडी- ०२
शिवसेना उद्धव ठाकरे गट- ०१
राष्ट्रवादी शरद पवार गट – ०१
स्थानिक विकास आघाडी – ०१
एकूण = १२
मैंदर्गी नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपाचा भगवा
मैंदर्गी नगरपरिषदेच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होत १३५ वर्षांची स्थानिक गट-तटांची मक्तेदारी उद्ध्वस्त झाली आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या अंजली योगिनाथ बाजारमठ यांनी स्थानिक गटांचे उमेदवार शिवम पोतेनवरू यांचा २४७७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अंजली बाजारमठ यांना ५७४३, तर पोतेनवरू यांना ३२६६ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपाने २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत स्थानिक गटांचे वर्चस्व पूर्णपणे मोडीत काढले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने थेट राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विकासाचा अजेंडा मांडला आणि जनतेने त्यावर निर्णायक शिक्का मारला. नगरपरिषदेवर भगवा फडकताच शहरात जल्लोष झाला. हा विजय मैंदर्गीच्या राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.