'या' इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकास लागणार मार्गी, रवींद्र चव्हाण यांची माहिती
कल्याण : कल्याणमधील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि एलआयजी 1 इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. या इमारतींमधील रहिवाशांचे आमरण उपोषण मागे घेतेवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी येत्या रविवारी यासंदर्भात बैठक घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार या रखडलेल्या इमारतींमधील सभासद, माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची एक बैठक संपन्न झाली.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि एलआयजी 1 इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाप्रश्नी गेल्याच आठवड्यात रहिवाशांकडून आमरण उपोषण करण्यात आले. ज्यामध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेत याप्रकरणी सभासदांना न्याय देण्याचे आश्वस्त केले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही त्यासंदर्भात रविवारी बैठक घेण्याचे सांगितल्यानंतर आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. आणि कालच्या रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत इमारतीमधील सभासद, माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक बैठक संपन्न झाली.
गेल्या 14 वर्षांपासून आम्ही आमच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहोत, तर 44 महिन्यांपासून आमच्या घराचे भाडेही आम्हाला दिले नसल्याचे यावेळी सभासदांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. तर बांधकाम विकासक श्रीकांत शितोळे याच्याकडून बँकेने मंजूर केलेल्या 325 कोटींच्या अर्थसहाय्यात अपहार झाल्याचा पुनरुच्चार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी करत त्याच्यावर कायदेशीर कारवाईची आग्रही मागणी यावेळी केली. तसेच या विकासकाला आम्ही पुनर्विकास प्रक्रियेतून बाहेर काढले असून आता शासनाने हा प्रकल्प म्हाडा किंवा त्यांच्या इतर गृहनिर्माण विभागामार्फत पूर्ण करण्याची भूमिकाही नरेंद्र पवार यांनी या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मांडली. यावेळी भाजपचे सदानंद कोकणे आणि निखिल चव्हाण हेदेखील उपस्थित होते.
त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी आमदार नरेंद्र पवार तसेच या सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून घेत हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. गेल्या 14 वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या या लोकांना आपले हक्काचे घर मिळालेच पाहिजे. यासाठी उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आपण स्वतः आणि नरेंद्र पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व विषय समजावून सांगू. तसेच पुढील बैठकीसाठी त्यांची वेळ घेऊन त्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा विषय मार्गी लावण्याच्या दिशेने प्रयत्न करू असे ठोस आश्वासन या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे याप्रश्न न्याय मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भावना या सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.