Sahyadri Factory Election : प्रादेशिक साखर सहसंचालकांनी 'तो' निकाल ठेवला राखून; बाद उमेदवारी अर्ज प्रकरणाकडे सभासदांचे लक्ष
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात यांचे अर्ज बाद झाले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात यांचे अर्ज बाद झाल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी दिला होता. त्यावर संबंधित दोघांसह 10 जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे अपील करुन दाद मागितली होती. त्यावर साखर आयुक्तालयात सुनावणी झाली. त्यात मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले.
सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल 251 उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक राहुल देशमुख, सहाय्यक निबंधक (प्रशासन) संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली.
दाखल २५१ उमेदवारी अर्जांपैकी २०५ उमेदवारांचे २१८ अर्ज वैध ठरले आणि २९ उमेदवारांचे ३३ अर्ज अवैध ठरले. उमेदवार अर्जाची छाननी सुरु असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर, तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्याची सुनावणी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रीक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला.
दोघांनीही अपील केले दाखल
त्यानंतर संबंधित दोघांनीही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निकालावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५२ अ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले. त्याची सुनावणी साखर आयुक्तालयात प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्यासमोर झाली. यावेळी संबंधित दोन्ही अपिलार्थी यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.