
धाराशिव : महाराष्ट्रातील दुष्काळ व अवकाळी सारख्या नैसर्गिक आपत्तीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ मागे घेवून दिलासा द्यावा. अशी मागणी लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वाणिज्य मंत्रालय व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारने 2014 साली जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असून भारतीय कांद्यास मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी आहे. भारतामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक , राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये जवळपास 300 लक्ष टन एवढे कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी 40 टक्के उत्पादन हे केवळ महाराष्ट्रात होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव तसेच सोलापूर या कांद्याच्या देशांतर्गत सर्वात मोठ्या बाजारपेठा असून लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेस लासलगाव येथून कांदा निर्यात होत असतो. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा काढणीस आलेला कांदा हा शेतावरती सडून गेल्यामुळे तसेच बाजारपेठेमध्ये नेण्यायोग्य कांदा नसल्यामुळे कांद्याचे दर व देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कांद्याचे दर वाढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून मागील आठवड्यामध्ये कांदा निर्याती वरती 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली असून भाजप सरकारने हे केवळ लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच काही व्यापारी दबाव गटांच्या मागणी साठी हा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ करणारे सरकार फक्त खते व किटकनाशकाच्या दरात वाढ करुन वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असल्याचे भावना शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वाणिज्य मंत्रालय व वाणिज्य मंत्री मा पियुष गोयल यांना पत्राद्वारे कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ हटविण्याबाबतची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.