
Kolhapur News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू; सकाळी सहापासून...
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत, भयमुक्त आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. हे आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत देण्यात आले आहेत. निवडणूक काळात लाऊडस्पीकरचा वापर सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० नंतर करता येणार नाही.
तसेच पोलीस परवानगीशिवाय व्यासपीठावर किंवा वाहनावर लाऊडस्पीकर लावता येणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या ४८ तास आदी लाऊडस्पीकर वापरास पूर्ण बंदी राहील. मतदान केंद्रांच्या आसपास तसेच दवाखाने, शाळा, धार्मिक स्थळांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये उघडता येणार नाहीत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात आणि मतदान केंद्रापासून २०० मीटर परिसरात प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, दबाव टाकणे, उमेदवारांचे चिन्ह असलेले फलक लावणे, मोबाईल किंवा वायरलेस साधनांचा वापर करणे यास बंदी आहे. तसेच अनधिकृत व्यक्तींना मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या तरतुदींनुसार निवडणूक प्रचार साहित्याची छपाई नियमांनुसारच करावी लागेल. शस्त्र अधिनियम १९५९ व नियम १९६२ नुसार काही खास परिस्थितीत पोलीस परवानगीने बँका, धार्मिक स्थळे, औद्योगिक युनिट यांना शस्त्र वाहतूक करता येईल. मात्र हा आदेश शासकीय अधिकारी व पोलिसांवर लागू राहणार नाही.
3 पेक्षा जास्त वाहनांना बंदी
निवडणूक काळात कोणत्याही परिस्थितीत ३ पेक्षा जास्त वाहनांचा ताफा वापरता येणार नाही. मात्र झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींना यामधून सूट देण्यात आली आहे. मतदार नसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना मतदान पूर्ण होण्याच्या ४८ तास आधी त्या परिसरात थांबता येणार नाही. आदेशाचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार कारवाई करण्यात येईल.
हेदेखील वाचा : Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी पुन्हा मोठे बदल; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान