
river depth has changed due to the ongoing sand mining in the riverbed at Ardhapur
Illegal sand mining : नांदेड : अर्धापूर येथील अवैध रेतीउत्खनन प्रकरणात प्रभारी तहसीलदारावर महसूल विभागातील कर्मचाऱ्यानेच केलेल्या हल्ल्याने प्रशासनातील शिस्त व नियंत्रणावर प्रश्नचिन्ह तर निर्माण केलेच आहे; मात्र या घटनांनी नदीपात्रातील सुरु असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे उभे राहत असलेल्या पर्यावरणीय संकटाकडेही दुर्लक्ष होत असल्याची तीव्र चिंता पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक पर्यावरण अभ्यासकांच्या मते गोदावरी व तिच्या उपनद्यांमधील अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीपात्राची खोली असमतोल झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणून पाण्याचा प्रवाह बदलत आहे, नदीकाठाची धूप वाढत आहे, भूजलपातळी झपाट्याने खाली जात आहे. आणि जलवर जीवसृष्टीच्या अस्तित्वावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.
‘नष्ट केल्या’ म्हणणाऱ्या बोटी प्रत्यक्षात कार्यरत ?
नहसूल विभागाने वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या काही बोटी नष्ट केल्याचा दावा केला असला, तरी नदीपात्रात अजूनही अनेक बोटी सक्रिय असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. महिनोन्महिने सतत चालणारे अवैध रेती उत्खनन व बोटीचा वापर करून बेसुमार रेती उपसा करण्याचा कार्यक्रम प्रशासनाला दिसत नाही का, असा पवाल पर्यावरणप्रेमी करत आहेत. कामातून बाद झालेल्या बोटी नष्ट करणे आणि प्रत्यक्षात वाळू काढणाऱ्या बोटी मात्र सुरक्षित ठेवणे या विरोधाभासी कार्यपद्धतीमुळे नशासनाच्या हेतूंवर संशय कायम आहे.
हे देखील वाचा : जेवणाच्या टेंडरमध्ये आर्थिक घोटाळा? सिनेट सदस्यांनी घेतली राज्यपालांकडे धाव, चौकशीची मागणी
नायगाव-बिलोली धक्के पर्यावरणासाठी ‘रेड झोन’
बिलोली व नायगाव परिसरातील धक्क्यावरून मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असल्याचा आरोप आहे. विशिष्ट लाभार्थ्यांना सूट देण्यात येत असल्याची चर्चा असून, या अनियंत्रित उपशामुळे नदीकिनाऱ्यांची रचना ढासळत चालली आहे. नदीचे पात्र सातत्याने बदलत असल्यामुळे नदीलगतच्या गावामध्ये महापुराचा विळखा बसल्यामुळे पाणी गावात शिरून शेतीचे व संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासाठी अवैध रेती उत्खनन जबाबदार असल्याचे पर्यावरण तज्ञ सांगतात.
हे देखील वाचा : वाढत्या थंडीने बारामती परिसरात हुडहुडी; व्यायामासाठी तरुणांची वाढती गर्दी
मद्यपी शिक्षक अखेर निलंबित
माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मद्यपी प्राथमिक शिक्षक अनंत रामचरण वर्मा यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सोमवार दि. ८ रोजी निलंबनाची कारवाई केली आहे. वर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसमोर गोंधळ घातला होता, या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांतून प्रसारीत झाला होता, वर्मा यांच्या मद्यधुंद कार्यक्रमाचा अहवाल माहूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. मद्यधुंद अवस्थेत शाळेत धिंगाण घालणे वर्मा यांना भोवले असून कार्यकारी अधिकाऱ्यांनी वर्मा यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जि.प.चा प्राथमिक शिक्षण विभाग राहील, असे या आदेशात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.