स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात क्रीडा महोत्सव जेवणात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पार पडलेल्या क्रीडा महोत्सव २०२५ दरम्यान जेवण पुरवठा निविदेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गंभीर तक्रार विद्यापीठाचे सिनेट सदस्य महेश मगर यांनी थेट महाराष्ट्र राज्यपाल तथा विद्यापीठ कुलपतींकडे दाखल केली आहे. राज्यातील विविध विद्यापीठातील सहभागी खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोपही या तक्रारीमध्ये त्यांनी केला आहे.
या क्रीडा महोत्सवामध्ये राज्यभरातून पाच हजारापेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. ४ ते ८ डिसेंबर दरम्यान खेळाडूंना पुरवलेले अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेकांना पोटदुखी, उलट्या, अशक्तपणा यांसारख्या आरोग्य विषयक तक्रारी जाणवल्या. नाश्त्यामध्ये देण्यात आलेल्या इडली वड्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याची तक्रार खेळाडूंनी केली आहे. काही खेळाडूंना सकाळच्या नाष्ट्यामध्ये आळ्या आढळल्याची तक्रार खेळाडूंनी केली होती. जेवताना भाजी न देणे, तर अंडा करीमध्ये अंडीच नसणे यासारखी धक्कादायक उदाहरणे समोर आली आहेत. पूर्वी रद्द करण्यात आलेल्या निविदेनंतरही प्राधिकरण सदस्यांच्या दबावाखाली परभणीच्या एका कंत्राटदाराला कंत्राट मंजूर केल्याचा आरोप आहे.
हे देखील वाचा : ९ डिसेंबरला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम
कंत्राटदार एका सदस्याचा नातलग
हा कंत्राटदार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्याचा जवळचा नातलग असल्याचे समजते. दरम्यान चौकशीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाला रीतसर तक्रार करण्यात आली होती. आज अन्न व प्रशासन विभागाचा एक अधिकारी
व कर्मचारी यांच्या पथकाने भेसळयुक्त सर्व खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. कंत्राटदाराने अपूरे कर्मचारी ठेवल्याने विद्यापीठाच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती करण्यात आल्याची तक्रार मगर यांनी केली.
हे देखील वाचा : “त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा…! सामाजिक नेते बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून खेळाडू आल्यामुळे थोडीफार गैरव्यवस्था होऊ शकते. केवळ पंधरा दिवसात विविध स्पर्धांसाठी मैदानी अद्ययावत तयार केली. ही मोठी उपलब्धी कोणी पाहत नाही याविषयी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय रैंकमध्ये विद्यापीठाचा क्रमांक १०० च्या आत यावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. केवळ कागदोपत्री तक्रारी करून विद्यापीठाच्या कर्मचारी व प्रशासनाचे मनोधैर्य करण्याचे हे प्रकार सुरू आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी राज्यपालांच्या दोन समित्या नांदेडला आलेल्या आहेत. त्यांचाही रिपोर्ट राज्यपालांकडे जाईल. काही मंडळी विद्यापीठाचे नाव बदनाम करत आहेत.






