Rivers in Maharashtra flood Krishnamai, water enters in Nrisinghwadi Morya Gosavi Wai Ganpati temple
कराड : महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली असून 16 हून अधिक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. सर्व धरणे भरली असून नदीची पात्रे पूर्णपणे भरली आहेत. दरम्यान, नदीच्या काठी वसलेल्या अनेक पुरातन मंदिरांमध्ये पाणी शिरले आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत ज्या देवांना भेटायला नदी वाहत येते. यामध्ये कृष्णामाई देवी, वाईचा गणपती, नृरसिंहवाडी अशा अनेक मंदिरांचा समावेश आहे.
कृष्णा-कोयना नद्यांच्या पवित्र प्रीतिसंगमावर स्थानापन्न असलेली कराडनगरीची ग्रामदेवता, कृष्णामाई देवीला भेटायला नदी आली आहे. यानिमित्ताने श्रावणी सोमवारची यात्रा परंपरेने उत्साही वातावरणात अन् दिमाखात साजरी झाली. पावसाच्या सरी अंगावर झेलत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मनोभावे दर्शन घेताना, तिची खणा-नारळाने ओटी भरली. यात्रेमुळे अवघा कृष्णा घाट व प्रीतिसंगम परिसर कृष्णामाईच्या भक्तांनी फुलून गेला होता.
प्रथेप्रमाणे सकाळपासून कराड पंचक्रोशीसह ठिकठिकाणच्या पालख्या सवाद्य मिरवणुकांनी देवाला घेऊन कृष्णामाईच्या भेटीला आल्या होत्या. दिवसभरात पावसाची उघडीप बघून महिला व युवतींनी कृष्णामाई देवीबरोबरच कृष्णा नदीची खणा-नारळाने ओटी भरली. दरवेळेप्रमाणे फुलांनी सजवलेल्या कमानी आणि सुवर्ण अलंकारांनी नटलेली, भरजरी साडीतील कृष्णामाई देवीचे दिव्य रूप पाहून भाविक भक्तिरसात चिंब झाले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नृरसिंहवाडी मंदिराला पुराच्या पाण्याच्या विळखा
कोयना, राधानगरी धरणातील विसर्गानतंर वारणा धरणातुनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नृसिंहवाडी मंदिराला पुराच्या पाण्याच्या विळखा पडला आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी २६ फुट ८ इंच, तर नृसिंहवाडीजवळ पाणी पातळी ३५ फुटावर गेली आहे. धरणातील विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून नृसिंहवाडी मंदिराला पुराच्या पाण्याच्या विळखा पडला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पोहचले आहे.
वाईमध्ये नदीच्या किनाऱ्यावर महागणपतीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये देखील पावसाच्या पाण्याचा अभिषेक होत असतो. यंदा देखील वाई शहरातील प्रसिद्ध महागणपती मंदिराच्या परिसरात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे पाणी शिरले आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे मंदिराच्या परिसरात पाणी आले आहे. गणपती बाप्पाच्या चरणापर्यंत हे पाणी पोहचले आहे. या दिव्य सोहळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यामध्ये देखील पावसाची संततधार सुरु आहे. खडकवासला साखळी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरु असून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. दरम्यान, पुणे शहरातील नदी पात्रामध्ये असणाऱ्या ओंकारेश्वर मंदिर परिसरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड भागामध्ये असणाऱ्या मोरया गोसावी मंदिरामध्ये देखील पाणी शिरले आहे. नदीला पाणी सोडल्यानंतर दरवर्षी मोरया गोसावी हे मंदिर पाण्याखाली जात असते. त्यामुळे पुण्यातील ही दोन्हीही मंदिरे बंद करण्यात आली आहे.