Gondia Accident
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील विविध रस्त्यांवर एकूण 122 रस्ते अपघात झाले आहेत. यात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी 92 जण गंभीर जखमी झाले. माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत ही बाब पुढे आली आहे. 2019 ते जून 2023 या कालावधीत तालुक्यात 122 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यात आतापर्यंत 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तालुक्यातील रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. दिवसेंदिवस रस्ते अपघाताला शेकडो दुचाकी वाहनचालक हे बळी पडत आहेत. बहुतांश रस्ते अपघात वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. त्याचवेळी रस्त्यावर चालत असलेले अवजड वाहने कारणीभूत ठरत आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेले अनेक खड्डेही जीवघेणे ठरत आहेत.
मागील पाच वर्षांच्या अपघाताची आकडेवारी पाहिल्यास सन 2019 मध्ये 25 रस्ते अपघात झाले आहेत. यात 12 जणांना आपला जीव गमावावा लागला. तसेच 2020 या वर्षात 11 रस्ते अपघातांत 3 जणांनी आपला जीव गमावला आहे.
वाहतूक विभागाकडून जनजागृतीची गरज
नियमाप्रमाणे आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले नाही. रस्त्यावर वाहने धोकादायक स्थितीत उभी करून ये-जा करणाऱ्या लोकांना अडथळा झाल्यास कलम 283 भांदविप्रमाणे नियमित कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे वाहतूक विभागाने धडक मोहीम राबवून जनजागृती करण्याची गरज आहे.