अलिबाग : साळाव–तळेखार महामार्गाची दुर्दशा! सहा महिन्यांपासून उखडून ठेवलेल्या १३ किमी रस्त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला. MSIDC आणि कंत्राटदाराच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराला नागरिकांचा जाहीर चपराक देत आज अलिबाग येथे प्रचंड पावसात उग्र रास्तारोको पेटला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, जिल्हापरिषद सदस्य राजेश्री मिसाळ, मुरूड तालुकाप्रमुख नवशाद दळवी, युवासेना तालुकाप्रमुख किशोर काजारे, चणेरा विभाग प्रमुख मनोज तांडेल, चोरडे सरपंच तृप्ती घाग, साळाव सरपंच वैभव कांबळे, मिठेखार सरपंच अशोक वाघमारे, नागाव सरपंच नंदकुमार मयेकर, विशाल तांबडे, रमेश गायकर, सनी ठाकूर शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तब्बल २०० ते २५० नागरिकांनी भर रस्त्यात बसून तीव्र आंदोलन छेडले.
खड्डे, चिखल, अपघात व प्रवाशांचे हाल यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश अक्षरशः ओसंडून वाहत होता. प्रचंड पावसाची पर्वा न करता घोषणाबाजी, आक्रमक जाहीर इशारे आणि उग्र घोषणांनी परिसर दणाणून गेला. “ढिसाळ कारभार करणाऱ्या MSIDC आणि कंत्राटदाराला यापुढे नागरिक माफ करणार नाहीत; मागण्या मान्य न झाल्यास याहूनही भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल!” अशी जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे यांची गर्जना झाली.
आंदोलनादरम्यान नागरिकांचे निवेदन MSIDC चे मुख्य अधिकारी एम.के. सिंग यांना देण्यात आले. नागरिकांनी गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, डिसेंबर २०२५ पूर्वी संपूर्ण महामार्गाचे कॉंक्रिट काम पूर्ण करावे, कामादरम्यान अभियंता उपस्थित असावा, प्रतिबिंबक व सूचना फलक लावावेत आणि कुचराई झाल्यास MSIDC व कंत्राटदार जबाबदार धरावा, अशा ठोस मागण्या केल्या आहेत. यावर सिंग यांनी गणपतीच्या आगमनापूर्वी म्हणजेच दि. २३ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल” अशी हमी दिली.
याचपार्श्वभूमीवर नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, हा रास्तारोको हा फक्त इशारा आहे. पुढचा मोर्चा आणखी आक्रमक आणि व्यापक असेल. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे; प्रशासनाने अजूनही डोळेझाक केली तर रस्त्यावरील संतापाचा ज्वालामुखी फुटेल आणि शासन-कंत्राटदार दोघेही थेट जबाबदार असतील.