मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पावसाचा आढावा घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
CM Fadnavis on Mumbai Rain : मुंबई : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ अशा सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांचे देखील नुकसान झाले आहे. मुंबईमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडला असून मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले आहे. मुंबईतील लोकल सेवेवर देखील याचा परिणाम झाला आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेवून आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पावसाची पाहणी केली आहे. तसेच आढावा देखील घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील स्थितीचा आढावा घेत महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबईचा विचार केला तर आज सकाळी सहा वाजेपूर्वीच्या 48 तासांत जवळपास 200 एमएम पाऊस पडला. आणि आज सकाळपासून सहा ते आठ तासांत तब्बल 170 एमएम पाऊस पडला आहे. म्हणजेच मुंबईत प्रचंड पाऊस पडला आहे,” अशी पावसाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या उपाययोजना सांगत नागरिकांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आज मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईत ट्रॅफिक स्लो झालेले आहे. मात्र कुठेही लोकल पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. काही गोष्टींमुळे लोकलचा वेग कमी झालेला आहे. लोकल लेट चालू आहेत. डॉप्लरने आलेल्या माहितीनुसार पुढच्या 10 ते 12 तास पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. मुंबईला रेड अलर्ट मिळालेला आहे. हीच बाब लक्षात घेता दुपारच्या सत्रांत शाळांना आपण सुट्टी दिलेली आहे. मंत्रालयातही दुपारी चार वाजेनंतर लोकांना निघून जाण्याची परवानगी आपण देत आहोत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे फडणवीस म्हणाले की, “संध्याकाळी सहा-साडेसहानंतर समुद्रात किमान तीन मीटरच्या लाटा असतील. उद्या चार मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भरतीचा काळ आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल. त्यामुळे समुद्राची आणि नाल्यांची पातळी सारखी असेल. आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करावे लागेल. याची व्यवस्था मुंबई पालिकेने तयार केली आहे. लोकांनी काळजी घ्यावी. लाटा पाहण्याच्या मोहापाई लोक अडचणीत येतात, असे म्हणत नागरिकांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.