बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व पक्षांते लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबामधील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्यामुळे लढत आणखी रंगणार आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार व शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील या पवार कुटुंबातील लढ्यामध्ये आणखी एक ‘पवार’ सामील होण्याची शक्यता आहे. सुनंदा पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार या रोहित पवार यांच्या आई आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा लढा होणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. यामध्ये आता आणखी एका पवार कुटुंबातील सदस्याची भर पडली आहे. येत्या 18 एप्रिल रोजी सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचे उमेदवारी अर्ज देखील घेण्यात आले आहेत. यानंतर आता सुनंदा राजेंद्र पवार यांच्या नावाने देखील उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अर्ज घेतला आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी सुनंदा पवार यांनी देखील अर्ज घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीकडून सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. सुनंदा पवार या रोहित पवार यांच्या आई आहे. बारामती ॲग्रो आणि भीमथडी यात्रेच्या माध्यमातून सुनंदा पवार यांचा जनसंपर्क चांगला आहे. सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. मात्र त्यांचा अर्ज कोणत्याही कारणामुळे बाद ठरवण्यात आला किंवा त्रुटी आढळून आल्या तर महाविकास आघाडीकडून खबरदारी घेण्यात आली आहे. पर्यायी अर्ज म्हणून महाविकास आघाडीकडून सुनंदा पवार यांच्यासाठी अर्ज घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता सुनंदा पवार यांचे देखील नाव चर्चेच्या वर्तुळामध्ये आले आहे.
अजित पवार यांनी देखील घेतला उमेदवारी अर्ज
महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत काळजी घेण्यात येत आहे. महायुतीकडून देखील अधिकृत उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाचा अर्ज देखील घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांचा देखील उमेदवारी अर्ज घेण्यात आलेला आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज कोणत्याही कारणामुळे बाद ठरला तर पर्याय म्हणून अजित पवार यांचा अर्ज देखील घेण्यात आलेला आहे.