
अपक्ष उमेदवाराचा आरपीआयचा उमेदवार म्हणून प्रचार; नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
प्रभाग क्रमांक १४ ब मधील आरपीआय (आठवले) भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार संगम उर्फ संग्राम बनसोडे आहेत. मात्र अपक्ष असलेले प्रवीण बनसोडे आपण आरपीआयचे (आठवले) पुरस्कृत उमेदवार असल्याचा खोटा प्रचार करत असल्याने मतदारांत संभ्रम निर्माण करत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. यावर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (१२ डिसेंबर) सकाळी ११ वाजता तातडीची बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात आली. आरपीआय आणि भाजपा महायुतीतून संग्राम बनसोडे हे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या उमेद्वाराविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या तिन्ही प्रभागातील आक्षेप न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने २ डिसेंबर रोजी होणारे मतदान या तिन्ही प्रभागात होऊ शकले नाही. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवारी २० डिसेंबर रोजी या तीन प्रभागासाठी मतदान होऊन रविवारी २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र अद्यापही निवडणुकीतून अधिकृत उमेदवारी नसताना आणि पुरस्कृत असल्याचेही अधिकृत पत्र नसताना एक अपक्ष उमेदवार खोडसाळ प्रचार करत असल्याने आणखी नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असून, आणखी निवडणूक प्रक्रिया लांबते की काय अशी भीती लोकांतून व्यक्त केली जात आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी होऊ शकते रद्द
पक्षाचा अधिकृत आणि पुरस्कृत म्हणूनही मान्यता नसताना निवडणुकीत उभा असलेला अपक्ष उमेदवार आपण एखाद्या पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असल्याचा जर प्रचार करत असेल, तर योग्य पुराव्यासह निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार केल्यास त्याची उमेदवारी रद्द होऊ शकेल, असे जाणकार विधिज्ञांचे म्हणणे आहे. खोटा प्रचार करून हा उमेदवार निवडून आला तरी भविष्यात तो निकाल रद्द होऊ शकतो, असेही जाणकार विधिज्ञांचे मत आहे.