सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजता महाराष्ट्रातील नागपूरमधील महाल परिसरात हिंसाचार उसळला ज्यामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंपच्या आंदोलनादरम्यान एका समुदायाचे धार्मिक ग्रंथ जाळण्यात आल्याची अफवा परिसरात पसरली. दरम्यान नागपूर येथे झालेला हिंसाचार आणि औरंजगेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नागुपरात औरंगजेबाची कबर हटवण्यावरून प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. या सर्व परिस्थितीवर पोलिस यंत्रणांनी कडक कारवाई करत वातावरण शांत केले. या झालेल्या जाळपोळीनंतर नागपुरात मंगळवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण दिसून आले. असे जरी असले तरी प्रशासनाकडून नागपुरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. इतकेच नाहीतर अनेक शाळांना सुट्टीही जाहीर केली गेली.
नेमके घडले काय होते?
नागपूर शहरात १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता महाल परिसरात औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी गवताच्या पेंड्यांची प्रतीकात्मक कबर काढून आंदोलन केले. याबाबत गणेश पेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र या आंदोलनाबाबत अफवा पसरली व काही समाज घटकांनी हंसापुरी भागात जमाव करीत हिंसक आंदोलन केले. या भागात १२ दुचाकी जाळण्यात आल्या. तसेच भालदापूर भागात दोन जेसीबी, क्रेन आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली. येथे दगडफेकही करण्यात आली. या संपूर्ण घटनांमध्ये ३३ पोलीस जखमी झाले असून पाच नागरिक जखमी झाले आहेत. यापैकी तीन नागरिकांना उपचाराअंती सोडण्यात आले, तर दोन नागरिकांवर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिस उपायुक्त दर्जाचे तीन अधिकारीही जखमी झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय?
नागपूरमध्ये ही हिंसा झाली, त्यावर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. बंगळुरूमध्ये लवकरच संघाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होणार आहे.
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड अखेर समोर
नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये या घटनेचा सूत्रधार उघड झाला आहे. एफआयआरनुसार, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चे शहर अध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली.यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या समाधीविरुद्ध घोषणाबाजी केली आणि औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. फहीम शमीम याच्या नेतृत्वाखाली या विरोधात लोकांचा जमाव जमला असल्याची माहिती समोर येत आहे.