
मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक; आरटीओ अन् वाहतूक पोलिसांनी केली मोठी कारवाई
पिंपरी : शालेय विद्यार्थ्यांची जीव धोक्यात घालून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी संयुक्त तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईतून समोर आलेली आकडेवारी हादरवणारी ठरली आहे. तपासलेल्या १५७ स्कूल व्हॅन व रिक्षांपैकी तब्बल १२८ वाहने (८१.५२ टक्के) दोषी आढळली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांसमोर आणि मुख्य रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ केलेल्या तपासणीत गंभीर नियमभंग उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना ‘कोंडून’ वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले आहे.
कारवाईचे आकडेवारीत चित्र
तपासलेल्या स्कूल बस : १७७
कारवाई झालेल्या बस : ७७
तपासलेल्या व्हॅन/रिक्षा : १५७
कारवाई झालेल्या व्हॅन/रिक्षा : १२८
एकूण आकारलेला दंड : ७,६९,७५०
पालकांची अडचण, मुलांचा धोका
शाळेकडून चालवल्या जाणाऱ्या बसच्या तुलनेत व्हॅन व रिक्षाचे दर कमी असल्याने पालक परवडणारा पर्याय निवडतात. मात्र या सोयीच्या निवडीमुळे मुलांच्या सुरक्षेची गंभीर तडजोड होत आहे. पालकांना रोजची चिंता आणि मुलांना जीवघेणी सफर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.