कागल / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतीतील पिकांचा उत्पादन खर्च आणि ग्राहकांच्या समन्वयातून उत्पादनांचे दर ठरविले जावेत, या हेतूने बाजार समित्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या बाजार समित्यांचे खरे मालक हे शेतकरीच आहेत. असे असताना स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा समजणाऱ्या मुश्रीफ साहेबांना बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचे अधिकार मिळत आहेत याचा पोटशूळ का? अशी विचारणा समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी केली. याबाबतचे पत्रक त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रकात म्हटले की, आजपर्यंत या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. याला कायमचा लगाम घालण्यासाठी आणि बाजार समित्यांचा कारभार जनताभिमुख होण्यासाठी राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार योग्यच आहे. विद्यमान सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
पावसाळा मध्यावर आला तरी आमदार साहेबांना पूर आढावा मीटिंग घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. आम्ही भाजप या राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) या नात्याने आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. तहसीलदारांना आम्ही भेटलो यात गैर काय? तथापि जनतेच्या समस्यांबाबत तहसीलदारांना कोणी भेटावे, कोणी भेटू नये हे अधिकार तुमच्या हितचिंतकाना कोणी दिले? ही मक्तेदारी आता थांबवावी, असेही पत्रकात म्हटले आहे.