
राजकीय घडामोडींना वेग! तासगावात संजय पाटलांचा संवाद मेळावा; पुढील रणनीती ठरणार?
गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या निसटत्या पराभवानंतर संजय पाटील व त्यांचा गट काहीसा शांत होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे भाजपसोबत त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झाला होता. परिणामी, पाटील समर्थकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र, आजच्या संवाद बैठकीमुळे त्यांच्या गटात पुन्हा एकदा उत्साहाची लाट निर्माण झाली आहे.
या संवाद बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमधील आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मतांचा घेतला जाणारा हा संवाद संजय पाटील यांची नवी राजकीय दिशा ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
काेणती भूमिका मांडणार?
संजय पाटील संघर्षशील आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. त्यांच्या राजकारणात ‘शांतता’ ही अवस्था दुर्मीळ मानली जाते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी घेतलेले मौन समर्थक आणि विरोधक या दोघांनाही संभ्रमात टाकणारे ठरले होते. त्यामुळे बैठकीत ते कोणती भूमिका मांडतात, कोणत्या पक्षासोबत आपली राजकीय दिशा ठरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिशा ठरवणारा ‘टर्निंग पॉईंट’
दरम्यान, सोशल मीडियावर या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार चर्चा सुरू असून, मोठा विषय…! ही टॅगलाइन प्रचंड व्हायरल झाली आहे. पाटील यांच्या भूमिकेवरून तासगावच्या राजकारणात नव्या समीकरणांची बीजे रोवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, कार्यकर्ता संवाद बैठक ही केवळ राजकीय कार्यक्रम न राहता, तासगाव आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील पुढील दिशा ठरवणारा ‘टर्निंग पॉईंट’ ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.