राज्याच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी (२० मे) विस्तार करण्यात आला. छगन भुजबळ यांनी काल राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे रिक्त झालेल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार भुजबळांकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. पण छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे राज्य सरकारवरच विरोधकांकडून आरोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवरून दैनिक सामनातून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. “शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला.” अशा शब्दांत कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदेंना आव्हान दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे आदेश देणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शक्य नाही, असे कारण सांगत एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते. हाच मुद्दा उपस्थित करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर आगपाखड केली आहे. “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंधे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मिंधे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते.शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आता मिंधे यांची अशी कोंडी अमित शहा व फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या, नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला.” अशा शब्दांत एकनाथ शिंदेंवर जहरी टीका करण्यात आली आहे.
पुण्यासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाने म्हटलं, ‘पुढील सहा दिवस…’
भुजबळ यांच्याविरोधातील काही भ्रष्टाचार प्रकरणांवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. एकेकाळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत, “भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू,” अशी ललकारी दिली होती. फडणवीस सातत्याने असे सांगत असत की भुजबळ व अजित पवार यांची योग्य जागा तुरुंगातच आहे, आणि अशा लोकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळीक ठेवली आहे, हे दुर्दैवी आहे.
त्याकाळी फडणवीस वारंवार असे सांगत असत की, “ठाकरे सरकार आम्ही पाडू आणि भुजबळ, अजित पवारांना चक्की पिसायला पाठवू.” भुजबळ अद्याप निर्दोष मुक्त झालेले नाहीत; ते सध्या केवळ जामिनावर बाहेर आहेत, हाही मुद्दा फडणवीस वारंवार अधोरेखित करत असत. परंतु आजची परिस्थिती अगदी वेगळी आहे — भुजबळ आणि अजित पवार हे दोघेही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपचे कार्यकर्तेही त्यांच्याशी सलगी करत “देवेंद्ररत्न” तेल लावून भ्रष्टाचाराच्या मुळाशीच बळकटपणा आणत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नाशिक पालकमंत्रिपदासाठी चुरस आणखीनच वाढली; शिवसेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादीचाही दावा
एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्याला तुरुंगात पाठवायचे, त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही, असे बोंबलायचे. नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात घेऊन लोकांना मूर्ख बनवायचे हा भारतीय जनता पक्षाचा धंदा आहे. अजित पवार, भुजबळांच्या मांड्यांचा फडणवीस व मिंध्यांना इतका तिटकारा आला होता की, मिंधे व फडणवीस हातात गदा घेऊन भुजबळ आणि अजित पवारांच्या मांडय़ा कीचकाप्रमाणे फोडतील असेच वाटत होते. मात्र काळाने या दोघांवर भयंकर सूड घेतला आहे असेच म्हणायला हवे,असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.