धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? तर मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मोठं विधान; म्हणाले... (File Photo : Chhagan Bhujbal)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक झाल्याने नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी चुरस आता आणखीन वाढली आहे.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. नाशिक जिल्ह्यास भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळाले आहे. त्यातच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्ष या जिल्ह्यात आपला दावा पालकमंत्रिपदावर करत आहेत. आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाकडे नाशिकचे पालकत्व जाणार? हे स्पष्ट होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आग्रही आहेत. भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री कोण होणार? हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
फडणवीस यांचा कल महाजन यांच्याकडे
देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन हवे आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी संकटमोचकाची भूमिका अनेकवेळा पार पाडली आहे. तसेच नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि अन्य कामांवर तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
भुजबळांनी राजभवनात घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. पण छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकेकाळी छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप मंत्री एकाच मंत्रिमंडळात असणार आहेत.