तुम्हाला खोटं वाटेल, पण वाल्मिक कराडकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी, घाबरलेल्या वाल्मिक दिले पैसे
बीड : आवादा कंपनीकडे २ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. या खडंणीच्या वादातून बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यामुळे खूनाचं मूळ खंडणीत आहे आणि या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या कराडनेच शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीला १५ लाखांची खंडणी दिल्याची माहिती उघडकीस समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बांगरविरुद्ध खंडणी प्रकरणात करण्यात आलेला एफआयआर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एक्सवर पोस्ट केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या ३ महिन्यांत त्यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडच्या दहशतीच्या अनेक घटना समोर आल्या. कराड आणि त्याच्या साथीदारांची दहशत विविध घटनांमधून समोर आली आहे. याच दहशतीतून त्याने आवादा कंपनीकडे २ कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास काम पुढे चालू देणार नाही, अशी धमकीच कराड टोळीकडून देण्यात आली होती. पण आता कराडकलाच एकाने धमकी देऊन १५ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाल्मिक कराड काढून १५ लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती असा FIR बाहेर आला आहे.
वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकिन” अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि १५ लाख करायच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले ?… pic.twitter.com/3ehRgkCJFe
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 7, 2025
अंगावर गाडी घालून ठार करण्याची धमकी शिवराज बांगरनं कराडला दिली होती. बांगरनं कराडकडे १५ लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या जन्ममित्र कंपनीतील कर्मचारी गणेश उगलेनं पोलिसांमध्ये फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी बांगरविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केली आहे.
जीवे मारण्याची भीती दाखवत बांगरने कराडकडून १५ लाखांची खंडणी वसूल केली. कराडच्या सांगण्यावरुन उगलेने बांगरला १५ लाखांची खंडणी दिली. खंडणीची रक्कम जन्ममित्र कंपनीच्या लॉकरमधून काढण्यात आली. आता त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १५ लाख रुपये घेतल्यावरही बांगरकडून कराडला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. गणेश उगलेने या प्रकरणी २ जानेवारी २०२४ रोजी पोलिसांत तक्रार दिली होती.
दरम्यान अंजली दमानिया यांनी कराडला देण्यात आलेल्या धमकीबाबत संशय व्यक्त केला आहे. कराडने जाणिवपूर्वक समोरच्या व्यक्तीला गोवण्याचा हेतूने एफआयआर केला असावा, अशी शंका दमानियांनी व्यक्त केली आहे. ‘त्या व्यक्तीला यांना अडकवायचं असेल म्हणून त्याच्यावर खंडणीचा आरोप टाकून एफआयआर केलेला दिसतोय. कारण कराडसारख्या माणसाला, ज्याची दहशत एकट्या बीडमध्येच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरही होती, अशा माणसाला कोणी धमकी देईल असं मला वाटत नाही. त्यामुळे ही बाब माझ्या बुद्धीला न पटण्यासारखी आहे. पण १५ लाख रुपये जगन्मित्राच्या तिजोरीतून दिले असा एफआयआर आपल्यासमोर आहे. त्याचं तथ्य मी शोधून काढणार आहे आणि अशा किती जणांना अडकवण्यासाठी कराडनं अशा खोट्या एफआयआर केल्या होत्या, याची माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे,’ असं दमानिया यांनी म्हटलं आहे.