गणेशोत्सव 2026 (फोटो- प्रथमेश पवार)
गणेशोत्सवाच्या काळात गणरायाऐवजी विराजमान होतात चक्क महादेव
महादेवाच्या मूर्तीचेही गणपतीप्रमाणेच केले जाते विसर्जन
६० ते ७० वर्षांपासून पवार कुटुंबीय ही आगळी परंपरा जपत आहेत
सातारा/Ganeshotsav: गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर येतो तो गणरायाचा मंगलमूर्ती रूपातील चेहरा. घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना होते, आरत्या घुमतात, मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो आणि काही दिवसांनी बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र, सातारा तालुक्यातील धावडशी गावातील एका वाड्यात गणेशोत्सवाच्या (Satara) काळात गणरायाऐवजी चक्क महादेव विराजमान होतात. गेल्या सुमारे ६० ते ७० वर्षांपासून पवार कुटुंबीय ही आगळी परंपरा जपत आहेत.
धावडशीतील पवार कुटुंबीयांच्या वाड्यात गणपतीच्या स्थापनेच्या दिवशी महादेवाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर गणपतीप्रमाणेच महादेवाची पूजा, आरती, नैवेद्य आणि धार्मिक विधी केले जातात. सात दिवसांचा उत्सव झाल्यानंतर महादेवाच्या मूर्तीचेही गणपतीप्रमाणेच विसर्जन केले जाते. या उत्सवात गौरींचीही स्थापना केली जाते.
खंड पडू नये म्हणून महादेवाची स्थापना
सुमारे सहा-सात दशकांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात पवार कुटुंबीयांच्या वाड्यातील एका व्यक्तीचे निधन झाले. त्यामुळे त्या वर्षी गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या परंपरेत खंड पडू नये, या भावनेतून कुटुंबीयांनी गणपतीऐवजी महादेवाची मूर्ती स्थापन केली. त्यानंतर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणपतीच्या जागी महादेवाची स्थापना करण्याची ही परंपरा सुरू राहिली.
पुढील पिढ्यांनीही श्रद्धेने ही परंपरा जपली असून आजही त्याच पद्धतीने महादेवाची स्थापना, पूजन आणि विसर्जन केले जाते. पवार कुटुंबीयांच्या मते, आज कुटुंबातील अनेक पिढ्यांना ही परंपरा परिचित आहे. उत्सवाचे नाव गणेशोत्सव असले, तरी त्यांच्या वाड्यातील श्रद्धेचे केंद्र मात्र महादेव असतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत या वाड्यातील वातावरण इतर घरांपेक्षा वेगळे दिसते. काळ बदलला, उत्सवाच्या पद्धती बदलल्या; मात्र एका जुन्या घटनेतून सुरू झालेली पवार कुटुंबाची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. गणरायाच्या उत्सवात महादेवाचे रूप जपणारा हा वाडा धावडशीच्या सांस्कृतिक परंपरेची वेगळीच ओळख बनला आहे.
आमच्या जन्मापूर्वीपासून ही परंपरा सुरू आहे. साधारण ६० ते ७० वर्षांपासून गणपतीऐवजी महादेवाची स्थापना केली जाते. आजही कुटुंबातील सर्वजण तीच परंपरा श्रद्धेने पुढे नेत आहेत.
– तानाजी पवार , पवार कुटुंबातील व्यक्ती






