
कवीकट्टथासाठी महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, 1762 कवितांमधून 450 कवितांची निवड कट्ट्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये बृहन्महाराष्ट्रातील 140 कविता आहेत. जपान आणि आबुधाबी येथूनही एकेक कविता आली आहे. 22 तास 22सत्रांत कवीकट्टा सुरू राहणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने मराठी भाषेचा मानबिंदू जपणारी संस्कृती, संतपरंपरा आणि वैचारिक वारसा यांचे प्रभावी दर्शन घडवले. पारंपरिक वेशभूषा, सजवलेले रथ, बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शहर उत्साहात न्हाऊन निघाले, राजवाडा येथून संमेलनस्थळ असलेल्या शाहू मैदानापर्यंत निघालेल्या या ग्रंथदिंडीत लीळाचरित्र, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, ‘महासम्राट’ आणि ‘सीतायन’ या ग्रंथांच्या पालख्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या.