छताला तडे, स्लॅब गळती! कराडमधील पाल PHC च्या बांधकामात मोठा घोटाळा? काळभोर आक्रमक
या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी पाल येथे घटनास्थळी मदन काळभोर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, पाल गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी
पाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर बांधकाम विभागाच्या पत्रात RCC कॉलममध्ये Honey Combing, RCC भागात तडे, स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती तसेच जिन्याला तडे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
काळभोर यांनी यावेळी विजया कन्स्ट्रक्शनला विविध प्रकारची शासकीय कामे दिली जात असल्याचा आरोप केला. तसेच या संस्थेला सुमारे दीड कोटी रुपयांचे ड्रायव्हर व शिपाई सेवा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधा ड्रेसदेखील देण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
“ज्या ठेकेदाराकडून कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत, अशा ठेकेदाराला वारंवार विविध कामे का दिली जातात?” असा सवाल उपस्थित करत काळभोर यांनी अशा ठेकेदारांना भविष्यात शासकीय कामे देऊ नयेत, अशी मागणी केली.
दरम्यान, “माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये भविष्यात विजया कन्स्ट्रक्शनला कोणतेही काम देण्यात येणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका मदन काळभोर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या अहवालानुसार इमारतीची NDT चाचणी करण्यात आली असून काही भागात दुरुस्तीच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. आराखड्यात काही भागातील स्लॅब पुनर्बांधणी तसेच काही भागात Low Viscosity Epoxy Bonding आणि Injection Grouting करण्याची उपाययोजना दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दुरुस्ती करून प्रकरण संपविण्याऐवजी बांधकामातील त्रुटी नेमक्या का निर्माण झाल्या, त्यासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदार कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची भूमिका काळभोर यांनी घेतली.
पालसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामात गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले असून दर्जेदार काम न झाल्यास प्रसंगी पाल गावातून ग्रामस्थ मोठा उठाव करतील यामुळे ग्रामस्थांनी व मदन काळभोर यांनी उपस्थित केलेल्या आरोपांवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






