
अल्प पावसाने रब्बीवरही संकट! सिंचनाचा प्रश्न निर्माण, जलाशयांतील साठा सरासरीपेक्षा कमी
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात यंदा पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने त्याचे परिणाम आता केवळ खरीप पिकांपुरते मर्यादित राहणार नसून आगामी रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याने रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याचा परिणाम जलाशयांच्या पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे. २७ सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील ७३ प्रकल्पांमध्ये ७१७.५७दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा प्रकल्पांच्या एकूण उपयुक्त क्षमतेच्या ७६.८९ टक्के आहे. मात्र, याच तारखेच्या गत ५ वर्षाच्या सरासरी ८७३.७५ दलघमीच्या तुलनेत यंदाचा साठा तब्बल १५६.१८ दलघमीने कमी असून, सुमारे १७.९ टक्क्यांची तूट आहे. गेल्यावर्षी याच तारखेला जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८९९.९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदाचा साठा १८२.४२ दलघमीने कमी आहे. त्यामुळे पावसाळा अंतिम टप्प्यात असताना उपलब्ध पाणीसाठ्याबाबत चिंता कायम आहे.(फोटो सौजन्य – AI)
यंदाच्या पावसाळ्यात अनेक टप्प्यांत पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांना पावसाच्या अनिश्चिततेचा फटका बसला. आता रब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध पाणी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असलेल्या काही प्रकल्पांमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या तुर्तास नसली तरी तरी मोठ्या प्रकल्पांतील तूट चिंतेची बाब ठरत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये पुस, अरुणावती, बेंबळा, अधरपुस आणि अडाण या प्रकल्पांमध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत कमी साठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांचा उपयुक्त साठा ३०३.६८ दलघमी असून, तो त्यांच्या ४४४.८७ दलघमी असून, क्षमतेच्या ६८.२६ टक्के आहे.
Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
गोकी, वाघाडी, सायखेडा, बोरगाव आणि नवरगाव यांसारखे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. मात्र, जिल्ह्याची पाणीस्थिती केवळ काही जलाशयांच्या साठ्यावर अवलंबून नसून संपूर्ण जलसाठ्याची स्थिती आणि आगामी काळातील पाण्याची गरज यांचा विचार करणे आवश्यक आहे. सात मध्यम प्रकल्पांमध्ये २११.६४ दलघमी, म्हणजेच ८४.२४ टक्के उपयुक्त साठा आहे. या ७ प्रकल्पांची ५ वर्षांची सरासरी २४८.०३ दलघमी असून, यंदाचा साठा त्यापेक्षा ३६.३९ दलघमीने कमी आहे. ६३ लघु प्रकल्पांमध्ये २०२.२५ दलघमी, म्हणजे ८५.२७ टक्के साठा आहे.