पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर (फोटो - सोशल मीडिया)
पाटण : तालुक्यातील थेट सरपंच, सदस्य यांचे निधन, राजीनामा, अनर्हता अथवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील ६ ठिकाणी थेट सरपंच व १७ ग्रामपंचायतींमधील सदस्य अशा एकूण २३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोट निवडणूक होणार आहे. यासाठी २८ एप्रिल प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा निवडणूक रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.
तालुक्यातील भारसाखळे, संभाजीनगर, झाकडे, मान्याचीवाडी, गुंजाळी, गोठणे या ६ ग्रामपंचायतीत सरपंचपद रिक्त असल्याने येथे थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. गोठणे, कराटे, ढोरोशी, किल्ले मोरगिरी, नारळवाडी, मारूल हवेली, घोटील येथील प्रत्येकी ३, गाडखोप २, नाव, बहुले, लेंढोरी, भिलारवाडी, निवी येथील प्रत्येकी १, मराठवाडी, म्हावशी येथील प्रत्येकी ४ अशा रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ७ ते सोमवार १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. बुधवार १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. शुक्रवार १७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. त्याचदिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वितरण व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. मंगळवारी (दि.२८) एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बुधवारी (दि.२९) मतमोजणी होणार आहे. एकंदरीत पाटण तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.
हेदेखील वाचा : प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार? राज्यसभा निवडणुकीनंतर महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता






