सातारा : आज जगात क्रांती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे असे असताना दुसरीकडे भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या अधिकारासाठी, शिक्षणासाठी लढावे लागत आहे आणि हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे, यासारखे दुर्दैवी दुसरे काही नाही, अशी खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायतन यांच्या वतीने शुक्रवारी जकातवाडी येथे शारदाश्रमच्या प्रांगणात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुप्रिया सुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने, नारायण जावलीकर, रामभाऊ जाधव व संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
चळवळ अखंडपणे सुरू राहिली पाहिजे
पवार म्हणाले, माने यांनी पुरोगामी विचार रुजवण्यासाठी आयुष्याचा मोठा काळ खर्ची घातला. भटक्या विमुक्तांसाठी त्यांनी सुरू केलेल्या संस्थेला माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. या संस्थेला या पुढील काळातही सर्वतोपदी सहकार्य केले जाईल. मात्र आजच्या आधुनिक युगामध्ये अजूनही भटका विमुक्त जमातींचा संघर्ष संपलेला नाही हे दुर्दैवी आहे. याकरिता ही चळवळ वेगवेगळ्या माध्यमातून अखंडपणे सुरू राहिली पाहिजे आणि शोषित वंचितांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन झाले पाहिजे.
साहित्यिक, कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा
कार्याध्यक्ष लक्ष्मण माने म्हणाले, फुले आंबेडकर विचारधारेला अनुसरून परिवर्तनाच्या चळवळीत योगदान देणारे लेखक साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. ही संस्था शून्यातून उभी राहिली आहे. संस्था उभी करण्यामध्ये शरद पवार यांचे योगदान अमूल्य आहे. संस्थेच्या छत्रछायेखाली आजवर पन्नास हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिकून बाहेर पडले. पवार यांनी आम्हाला इतकं भरभरून दिले आहे की आता आम्हाला त्यांच्याकडून काही नको श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहू असेही ते म्हणाले.
रामभाऊ जाधव यांचा ‘जीवनगौरव’ने सन्मान
यंदाचा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार अर्थशास्त्रज्ञ शिक्षण डॉ. सुखदेव थोरात यांना वैचारिक चळवळीतील लेखक नारायण जावलीकर यांना यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार व भटक्या विमुक्त चळवळीत काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जाधव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.