लाथा मारणाऱ्यांना निवडून देणार का ?
येवला : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते तयारीला लागले आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभांचे सत्र वाढले आहेत. शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा नाशिकमधील येवल्यामध्ये दाखल झाली आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. एक बडा नेता पक्षामध्ये येण्यासाठी तयार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर शरद पवार गटामध्ये नेत्यांचे इनकमिंग जोरदार सुरु आहे. राजकीय खेळीमुळे शरद पवार यांची चर्चा आज देखील सुरु आहे. आता विधानसभा निवडणूकीपूर्वी अनेक धक्के पहायला मिळणार असल्याचे देखील महाविकास आघाडीकडून सांगण्यात येते. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येवल्यामध्ये पक्षांतर संबंधित महत्त्वाचे विधान केले. जयंत पाटील म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व आमदारांचा पराभव करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. येवला विधानसभा मतदारसंघात पाच ते सहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता इच्छा व्यक्त करणाऱ्यांनी एकत्र बसा आणि एकमेकांना वचन द्या की एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरे पाठिंबा देतील. नाहीतर मला तिकीट नाही मिळालं की मी चाललो तिकडे. असे असेल तर आधीच सांगा. त्यामुळे सर्व मिळून एकसंघ राहा. शरद पवार देतील तो आपला उमेदवार हे समजून काम करा” असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.
शिवस्वराज्य यात्रा नाशिक येथील येवले येथे पोहोचली. दुपारी चार पासून आलेली लोकं इतक्या उशिरा पर्यंत थांबली. पक्षाविषयी प्रेम असल्याशिवाय ही भावना निर्माण होत नाही. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
या देशातील शेतकरी जगला तर हा देश जगेल ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची… pic.twitter.com/G9HrV3Gtbq
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 24, 2024
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
आपल्या भाषणामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “तुतारी वाजवणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात अचानक प्रचंड मागणी आली आहे. शरद पवार यांच्याकडे तुम्ही दोन तास जाऊन जरी बसले तर तुमच्या लक्षात येईल. आता परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत होता. मग मी त्यांना म्हटलं का काय झालं? तिकडे तर बरोबर चाललंय तुमचं. ते मला म्हणाले मतदारसंघात जरा फिरलं तर सर्वजण म्हणतात की तुतारी घ्या, तुतारी. नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यामुळे आता तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात आपण वियजी होणार नाही असं अनेक मतदारसंघातील नेत्यांना वाटायला लागलेलं आहे. हीच शरद पवारांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्या सर्वांना येवला मतदारसंघात दाखवण्याचं काम करायचं आहे,” असे मत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला आहे.