माढ्यात तुतारी वाजली; बबन शिंदे यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का
कुर्डुवाडी/संतोष वाघमारे : माढा विधानसभा मतदारसंघातील बबनदादा शिंदे यांच्या तीस वर्षे एकहाती वर्चस्वाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अभिजित पाटील यांनी पहिल्या क्रमांकाची पसंतीची मते मिळवली आणि बबनदादा शिंदे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा ३० हजार ३७१ मतांनी पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
माढा विधानसभा निवडणूकीसाठी बुधवार दिनांक २० रोजी मतदान झाले. या निवडणूकीत अभिजित धनंजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -तुतारी), ॲड. मीनल दादासाहेब साठे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार-घड्याळ), रणजितसिंह बबनराव शिंदे (अपक्ष सफरचंद) या तीन प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. शनिवार दिनाक २३ रोजी सकाळी आठ वाजता कुर्डुवाडी येथील वखार महामंडळातील गोडाउनमध्ये या झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
प्रथम माढा तालुक्यातील ७८ गावांपासून मतमोजणीला सुरु झाली. यामध्ये एक ते चौदा फेऱ्यांध्ये माढ्याचा गड असताना या चौदा फेऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पाटील यांना ६७ हजार ७१० तर अपक्ष रणजित शिंदे यांना ६५ हजार ३४ मते मिळाली. यामध्ये शिंदे यांच्या माढ्यातूनच अभिजित पाटील यांच्या तुतारी या चिन्हाला २ हजार ६७६ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर १५ व्या फेरीपासून पंढरपुर भागातील मतमोजणीला सुरुवात झाली आणि १५ ते २६ फेऱ्यांपासून महाविकास आघाडीच्या अभिजित पाटलांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेत अखेरच्या २६ व्या फेरीत अभिजित पाटील यांना १ लाख ३५ हजार ४१८ मते मिळाली तर अपक्ष रणजित शिंदे यांना १ लाख ५ हजार ४७ मते मिळाली व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ॲड. मीनल साठे यांना १३ हजार २८० मते मिळाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांचा ३० हजार ३७१ मतांची आघाडी मिळाली आणि त्यांचा विजय झाला.
माढ्यातील एकूण २२८४ पोस्टल मतांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांना १ हजार १४१ मते मिळाली. अपक्ष रणजित शिंदे यांना ८९१ मते तर, महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड.मीनल साठे यांना १०१ मते मिळाली.
शरद पवार साहेब आणि मोहिते-पाटील या दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद आणि माढा मतदार संघातील सर्व मतदारांनी शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्यायची का तीस वर्षे घरात सत्ता असलेल्या कर्तृत्ववान पोराला द्यायचं हे ठरवून मला मताधिक्य दिले आहे. या मतदारसंघातील मतदार राजाने ३० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर ३० हजारांच्या मताधिक्याने मला निवडून दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व जनतेला माझा विजय समर्पित करतो. अशी प्रतिक्रीया अभिजित पाटील यांनी दिली आहे.