navneet ravi rana
अमरावती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राजकारण रंगले असून महायुतीमध्ये वाद सुरु आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभेपूर्वी महायुतीमधील घटकपक्षांमध्ये दुमत दिसून येत आहे. आरोप होत असून अनेक मागण्या केल्या जात आहे. भाजप नेते रवी राणा व नवनीत राणा यांच्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत आहे. यापूर्वी प्रहार नेते बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्यावर महायुतीमध्ये माराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्याने देखील नवनीत राणा यांना महायुतीमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
अमरावतीमध्ये लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजप नेत्या नवनीत राणा यांना देण्यात आली होती. त्यांच्या उमेदवारीला महायुतीचे घटक असलेल्या प्रहार संघटनेचा विरोध होता. तरी देखील राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू नाराज झाले. त्यांनी प्रहारचा उमेदवार अमरावतीमध्ये उभा केला. लोकसभेमध्ये मोठ्या प्रचारानंतर देखील अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यामुळे महायुतीमध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. आता शिंदे गटाच्या नेत्याने थेट नवनीत राणा यांना बाहेर काढा अशी मागणी केली आहे.
आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या
शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी भाजप नेत्यांकडून नवनीत राणा यांची तक्रार करत त्यांना महायुतीतून बाहेर करण्याची मागणी केली आहे. अभिजीत अडसूळ यांचे वडील आनंदराव अडसूळ यांनी देखील भाजप नेते अमित शाह यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता अभिजीत अडसूळ यांनी माध्यमांशी संवाद साधत नवनीत राणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा. ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे. शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा थेट इशारा अभिजीत अडसूळ यांनी दिला आहे.
जनतेनेही त्यांना जागा दाखवली
पुढे अभिजीत अडसूळ म्हणाले, “आमदार रवी राणा हे नेहमी वाचाळपणे बोलतात. राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं असल्याचं खळबळजनक दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध नाही. महायुतीत खडा टाकण्याचं काम ते करत आहे. बनावट प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला, त्यामुळेच जनतेनेही त्यांना जागा दाखवली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतली आहे. तरी राज्यपाल पदाच्या यादीत आनंदराव आडसूळ यांचं नाव का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचं नाव का डावलले गेलं?” असा सवाल अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केला आहे.