इंदापूर : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. मात्र आता पुन्हा एकदा नव्या चिन्हासह लढण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत.आणि हीच उर्मी मनाशी धरून मोहोळ (जि. सोलापूर) येथील शिवसैनिक तुळजापूर येथून धगधगती मशाल घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जात आहेत.
मशाल घेवून निघालेले शिवसैनिक नागेश पवार, हैदर इनामदार, सिताराम कुंभार यांचे सोमवारी (दि.१७) इंदापूर येथे आगमन झाले असता इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करत सन्मान करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित शिवसैनिकांनी इंदापूर नगरपरिषदे समोरील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून जय भवानी, जय शिवाजी, उद्धव साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली.
शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे नवी ऊर्जा अंगी बाळगून, स्फूर्तीने तुळजापूर येथून मातोश्री पर्यंत ही धगधगती मशाल घेऊन जाणार आहोत.ज्या गद्दारांनी गद्दारी केली आहे. त्यांच्या जीवावर माज करून दोन मित्रांच्या संगतीने हा संकल्प केला असल्याचे शिवसैनिक नागेश पवार यांनी सांगितले.
यावेळी वसंतराव आरडे म्हणाले की, तुळजापूर ते मातोश्री असा पायी प्रवास करत जे आमचे शिवसैनिक चालले आहेत. त्यांचे सर्व शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करतो. महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर जो अन्याय झालाय त्याची अशाच छोट-छोट्या कार्यातून वाचा फुटावी. उद्धव साहेबांना बळ मिळून त्यांनी पुन्हा राज निर्माण करावं.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, वसंतराव आरडे, बालाजी पाटील, दुर्वांस शेवाळे, दादासाहेब देवकर, संतोष क्षीरसागर, प्रदीप पवार, मोहन देवकर, अशोक देवकर, अवधूत पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.