
एकाने डीपीडीसीच्या निधीला तर एकाने शहर विकासाच्या निधीला स्थगिती दिली; खासदार ओमराजेंची टीका
नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकपदांच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. राज्यात आणि केंद्रात सत्ता यांची असताना विकास कामांच्या निधीची हे अडवाअडवी करतात. मुख्यमंत्र्यांकडे बसून नियोजन समितीचा विकास कामांचा निधी यांनी रोखून ठेवला आहे. शहर विकास कामांच्या निधीबाबतही तेरची मांजर आडवी गेल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ओमराजे म्हणाले, नगरपालिका आमच्याकडे असताना तीन उद्यानांसाठी आम्ही सात कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यासही स्थगितीची आडकाठी घालण्याचे पाप यांनी केले आहे. दुसऱ्या बाजूला मागील चार ते पाच वर्षपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नसल्याने तिथे प्रशासक राज आहे. राज्य सरकरच्या सल्ल्याने आणि नियंत्रणात हे प्रशासक नगराध्यक्षाचा कारभार पाहत होते. त्यामुळे जनतेच्या समस्या अनेक पटींनी वाढल्या. ना ना प्रश्नांना जनतेला तोंड द्यावे लागले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला. असा घणाघाती आरोप ओमराजोंनी केला.
ओमराजे म्हणाले की, सोमनाथ आप्पा गुरव यांनी या काळात जनतेच्या अनेक समस्यांना वाचा फोडून त्या सोडवून घेतल्या. सरकार आणि सत्तेला वठणीवर आणण्यासाठी अनेकवेळा त्यांनी आंदोलने केली. जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. शहराबाहेरून जाणाऱ्या रिंगरोडवर पोद्दार शाळेजवळ या महामार्गास सर्व्हिस रोड नसल्याने एका विद्यार्थ्यास नाहक आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी गुरव यांनी मोठे आंदोलन उभारून या सर्व्हिस रोडचे काम करण्यास सरकारला भाग पाडले.
सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असून धनशक्तीला रोखायचे असेल तर लोकांचा उमेदवार म्हणून सोमनाथ गुरव यांच्या शिवसेनेच्या (उबाठा) पत्नी संगीता गुरव याना विजयी करा. अप्पांनी जनतेच्या केलेल्या कामाची पावती द्या. त्यासोबतच महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेच्या नगरसेवकपदांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन ओमराजेंनी यावेळी केले. संध्याकाळी झालेल्या या सभेळी वातावरणात मोठा गारठा असूनही लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.