लाडक्या बहिणींसाठी शिवसेनेकडून महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन
मुंबई : लाडक्या बहिणींसाठी शिवसेनेकडून मुंबईत महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात येणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्या मीना कांबळी,शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव व चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी आज घोषणा केली.
शिवसेना नेत्या मीना कांबळी म्हणाल्या की, शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत पहिल्यांदाच शिवसेनेकडून लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांच्या गटासाठी महामंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेना नेत्या मीना कांबळी यांनी सांगितले. लाडक्या बहिणींसाठी यापूर्वी शिवसेनेने ८ मार्च २०२५ रोजी मुंबईत महिला दिनाचा कार्यक्रम घेतला होता. रविवार १० ऑगस्टपासून या कार्यक्रमांना पुन्हा सुरुवात होईल, असे ते म्हणाल्या.
महामंगळागौर स्पर्धेचा आज साहित्य संघाच्या सभागृहात उद्घाटन सोहळा होणार आहे. २३ ऑगस्ट २०२५ रोजी या स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगशारदा येथे पार पडेल, असे शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. महामंगळागौर स्पर्धेला मुंबईतून प्रचंड प्रतिसाद असून आतापर्यंत ५०० हून अधिक महिला संघांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी दिली.
यंदा राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानिमित्त शिवसेनेने उत्सव मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ३ लाख, दुसरे पारितोषिक २ लाख आणि तिसरे पारितोषिक १ लाख रुपये आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट उत्सवमूर्ती, सर्वोत्कृष्ट सजावट, सर्वोत्कृष्ट समाजकार्य या विभागात स्पर्धा होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शिवसेनेच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन शेलार यांनी केले.