शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन (फोटो सौजन्य-X)
Shivaji Maharaj Forts News in Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. या घटनेचा आज विधीमंडळ परिसरात सत्ताधाऱ्यांनी जल्लोश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे आमदार उपस्थित होते. त्यांनी एकमेंकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या (डब्ल्यूएचसी) ४७ व्या अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकार आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते!! महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन.
यावेळी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मी आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची या संदर्भात भेट घेतली होती. यामध्ये मतदानाचा अधिकार 20 देशांना असतो. या प्रस्तावावर सर्व 20 देशांनी एकमताने निवड केली. राजमुद्रेचा विचार त्यांनी समजून घेतला आणि काळाच्या पुढचा विचार असल्याचं त्यांना दिसलं. या कार्यात मदत केलेले सर्व, पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच “शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत. मानांकन टिकवणे हे मोठे आव्हान. सर्वच 20 देशांनी आपल्याबाजूने मतदान केलं. यूनेस्कोकडून शिवरायांच्या कौशल्याची दखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे शिवरायांचे गडकिल्ले जागतिक वारसा यादीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मराठा लष्करी भूदृश्यांमध्ये’ महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजय दुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ले आणि तामिळनाडूचा गिंगी किल्ला यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांनी हे किल्ले स्वराज्यासाठी बांधले होते. युनेस्कोच्या यादीत त्यांचा समावेश व्हावा यासाठी अनेकांनी योगदान दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जानेवारी २०२४ मध्ये जागतिक वारसा समितीकडे हा प्रस्ताव विचारार्थ पाठवण्यात आला. त्यानंतर सल्लागार संस्थांसोबत अनेक बैठका आणि स्थळांचा आढावा घेण्यात आता. दरम्यान आयकॉमच्या मिशनने दिलेल्या भेटीसह १८ महिन्यांच्या कठोर प्रक्रियेनंतर, शुक्रवारी संध्याकाळी पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्य कार्यालयात जागतिक वारसा समितीच्या सदस्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
समितीच्या बैठकीत २० पैकी १८ सदस्य देशांनी या महत्त्वाच्या स्थळाचा यादीत समावेश करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला, या प्रस्तावावर ५९ मिनिटे चर्चा झाली आणि १८ सदस्य देशांच्या सकारात्मक शिफारशींनंतर, सर्व सदस्य देश, युनेस्को, जागतिक वारसा केंद्र आणि युनेस्को सल्लागार संस्थांनी या महत्त्वाच्या प्रसंगाबद्दल भारताचे अभिनंदन केले.आता संपूर्ण देशात याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींपासून ते देशवासीयांपर्यंत देशभरात या प्रसंगी अभिनंदन केले जात आहे.