मुंबई : भाजपच्या खासदार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (BJP MP Navaneet Rana) शिवसेनेवर (Shivsena) सतत टीका करणाऱ्यात पुढे दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी हिंदुत्व (Hindutwa) आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) यावरून लक्ष्य केले होते. त्यावरून शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी नवनीत राणा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी इशाराही दिला आहे. पत्रात म्हटले आहे की, कोण आहात आपण ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या… एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला… असे अभिनयावरून म्हटले आहे.
काय संबंध आपला हनुमान चालीसा शी… हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही… म्हणे मी हनुमान भक्त… भाजपच्या सी… डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं… तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात… ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेलं ‘मातोश्री’ या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही, त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती? असेही पत्रात म्हटले आहे.
तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली वगैरे वगैरे… म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत… बाळासाहेबांचे राहिले नाहीत… पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केलादेखील… हे तुमच्यासारख्या ‘मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी ‘सी’ ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते… हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे, असा टोला लगावला आहे.
कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही, अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका… शिवसेना ही कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या १०० दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे… कितीही शुर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापू… अशा कडक शब्दात शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या संजना घाडी यांनी पत्रात सुनावले आहे.