sanjay shirsat react on mahayuti cm of maharashtra
मुंबई : राज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागल्यानंतर देखील सत्तास्थापनेला विलंब झाला आहे. एकनाथ शिंदे यांची मागणी व नाराजी यामुळे शपथविधीला उशीर झाला आहे. आता येत्या 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी होणार आहे. याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. आता आझाद मैदानाची शिंदे गट व भाजपच्या नेत्यांकडून पाहणी केली जात आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यासह गुलाबराव पाटील, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांचसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय चर्चांवर भाष्य केले. त्याचबरोबर टीका करणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले संजय शिरसाट?
माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर एक बैठक आयोजित केलेली आहे. ती बैठक घेतल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होऊ शकते” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे संजय शिरसाट यांनी शपथविधी सोहळ्याची तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, “आझाद मैदानात शपथ विधी सोहळ्यासाठी आमदारांच्या बैठकीची व्यवस्था कुठे केली आहे? किती गेट आहेत? शपथविधीसाठी ज्यांना निमंत्रित केलय, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एन्ट्री कुठून आहे? या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो” असं संजय शिरसाट म्हणाले. ‘पाच तारखेला पाच वाजता संध्याकाळी एक चांगला सोहळा पहायला मिळेल’ असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदेंचा पक्ष हा विरोधी पक्षात बसणार असं टि्वट अंजली दमानिया यांनी केलं. त्यावर शिरसाट म्हणाले की, “कोण अंजली दमानिया?. आम्ही प्रत्येकाला महत्त्व देत नाही” एकनाथ शिंदे विरोध करतायत, त्यामागे दिल्लीतली महाशक्ती आहे असं संजय राऊत म्हणाले, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, ‘लोकांना कंटाळा येईल एवढं बोलू नका, असा मी राऊतांना मित्रत्वाचा सल्ला देईन’ गुलाबराव पाटील म्हणतात एकनाथ शिंदे यांना एक वर्षांसाठी तरी मुख्यमंत्री करा, ‘या बाबतचा जो काही निर्णय असेल, तो वरिष्ठ घेतील’ मुख्यमंत्री कोण होणार, हे महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट आहे का? ‘याचा निकाल 4 तारखेला संध्याकाळी लागेल’ असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.