उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या शिवीराळ भाषेबद्दल मागितली माफी
मुंबई : शिवसेना गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी विधीमंडळामध्ये शिवराळ भाषा वापरली. सत्ताधारी आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत त्यांची सभागृहामध्ये मोठी खडाजंगी झाली. यानंतर अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. सत्ताधारींनी शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र डागले. यामुळे अंबादास दानवे यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत माफी देखील मागितली आहे.
मी माफी मागतो
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे यांच्याबद्दल आक्षेप काय आहे? ते सांगा. का निलंबन केलं? त्यांनी शिवीगाळ केली. बरोबर आहे. त्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माता भगिणींची माफी मागायला तयार आहे आणि मी माफी मागतो. कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच. मग लोकसभा प्रचारादरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण मुनगंटीवार यांनी बहीण-भावाबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याबद्दल कोण माफी मागणार आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
यांना जनता निलंबित करेल
पुढे ते म्हणाले, “अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिणींचा अपमान नाही? आमच्याकडून माता भगिणींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो. पण तसा त्यांनीदेखील माता भगिणींचा अपमान केला आहे. सभागृहात केला तर अपमान आणि जाहीर वक्तव्य केलं तर अपमान नाही, हे कुठलं गणित आहे. मग त्यांनासुद्धा निलंबित करणार का? सुधीर मुनगंटीवार यांना तिथल्या जनतेने निलंबित केलंच आहे, विधानसभेतही त्यांना जनता निलंबित करेल,” असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.