Shivsena Uddhav Thackeray meet President Draupadi Murmu
Uddhav Thackeray meet President draupadi murmu : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी अनेक नेते आणि मंत्री हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. काही नेते हे हाणामारी करत तर काही नेते शिवीगाळ करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळत आहे तर गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने बार आहे. यावरुन आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आता थेट राष्ट्रपतींकडे राज्यातील नेत्यांची तक्रार केली जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाने महाराष्ट्रातील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या तक्रारींबाबत राज्यपालांना निवेदन सादर केले होते. ठाकरे गटाच्या अनेक महत्त्वांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. मंत्र्यांवरील खटले, त्यांच्याविरुद्ध उपलब्ध पुरावे आणि त्यांच्या आक्षेपार्ह विधानांच्या आधारे ठाकरे गटाच्या शिवसेनेने राज्यपालांकडे लेखी तक्रार केली होती. यावर आता राज्यपाल सरकारला कारवाई करण्याचे निर्देश देतात का? याची शिवसेना ठाकरे गट वाट पाहत आहे. मात्र राज्यपालांना निवेदन देण्यावर ठाकरे गट थांबलेला नाही. आता महाराष्ट्रातील बेशिस्त आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची तक्रार उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे आणि ही भेट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात अंबादास दानवे यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार आणि दिल्लीतील काही खासदारांचाही समावेश असू शकतो. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे घोटाळे, बेताल वक्तव्ये आणि कारनामे याबाबत आता थेट राष्ट्रपतींना भेटून तीच तक्रार करणार आहेत आणि त्यांना एक निवेदनही सादर करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना सूचना मिळू शकतात
उद्धव ठाकरे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत, बैठकीनंतर राष्ट्रपती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांना वादात अडकलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याचे किंवा त्यांची मंत्रिपदे काढून घेण्याचे निर्देश देऊ शकतात. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या मंत्र्यांवर माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी लागू शकते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यातील काही नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. या वादग्रस्त नेत्यांची नावे मंत्री योगेश कदम, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, आमदार संजय गायकवाड, भरत गोगावले अशी आहेत. माणिकराव कोकाटे यांनी रमी खेळल्याचे प्रकरण, शिरसाट यांनी पैशांनी भरलेली बॅग ठेवल्याचे प्रकरण, संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचे प्रकरण आणि योगेश कदम यांनी त्यांच्या आईच्या नावाने बेकायदेशीर बार चालवल्याचे प्रकरण समोर आले आहे. या विरोधात उद्धव गटाने निषेध केला आहे. या मंत्र्यांविरुद्ध उपलब्ध पुरावे आणि त्यांच्या आक्षेपार्ह विधानांच्या आधारे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवसेनेने राज्यपालांकडे लेखी तक्रार केली होती. आता ते अशाच प्रकारची तक्रार घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत आणि त्यांनाही निवेदन सादर करणार आहेत.